"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 04:50 PM2024-05-26T16:50:54+5:302024-05-26T16:53:45+5:30

Pune Accident : पुण्यातल्या पोर्श अपघात प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धक्कादायक खुलास केला आहे.

Pune porsche accident mother of the minor requested the driver take the blame | "मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

Pune porsche accident :पुणे पोर्श अपघात प्रकरणाची गेल्या आठवडाभरापासून जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या रविवारी पुण्यात पहाटेच्या सुमारास विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी मुलाला १५ तासांतच जामीन मिळाला. तसेच विशाल अगरवाल यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर विशाल अगरवाल यांची पोलीस कोठडीत तर आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या सगळ्यात आरोपीच्या वडिलांनी  त्या दिवशी मुलगा नाहीतर ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे आरोपीच्या आजोबांनीही चालकाला डांबून ठेवत धमकावले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून अल्पवयीन मुलाने आलिशान कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतरपोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपी मुलाला जामीन मंजूर केला. त्यानंतर कोर्टाने आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली होती. दुसरीकडे विशाल अगरवाल यांनी त्या दिवशी मुलगा नाहीतर चालक गाडी चालवत होता असं म्हटलं होतं. मात्र आता
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत मोठा उलघडा केला. आरोपी मुलाच्या कुटुंबाने चालकावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाच्या कुटुंबाला मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी अपघाताची जबाबदारी घेण्यास भाग पाडले. कुटुंबाने ड्रायव्हर गंगाधरला मन वळवण्यासाठी धमक्या, पैसे आणि भेटवस्तू वापरल्याचा आरोप आहे. “आम्ही चालकाचे म्हणणे नोंदवले आहे. रविवारी (अपघातानंतर) पहाटे २:४५ च्या सुमारास बिल्डरने फोन केल्याचे त्याने सांगितले. अपघात झाला तेव्हा तो कारच्या स्टेअरिंगवर होता असं सांगण्याचा दबाव आरोपीच्या वडिलांनी चालकावर टाकला होता. बिल्डरच्या पत्नीनेही त्याला अपघाताची जबाबदारी घेण्याची भावनिक विनंती केली होती. कुटुंबातील सदस्यांनी त्याला असे करण्यासाठी विविध आमिषे दाखवली होती," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली.

"अपघातानंतर आरोपीचे मित्र आणि चालकाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. सुरुवातीला चालकाने आपणच गाडी चालवत होतो असं सांगितलं. पण, पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास बिल्डरने चालकाला सोडवले  आणि त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवला. त्यानंतर आरोपी मुलाच्या आजोबांनी चालकाला वडगावशेरी इथल्या बंगल्यात डांबून ठेवलं. आम्ही सांगू त्याप्रमाणे जबाब द्यायचा असा दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर चालकाचे कुटुंबिय अगरवाल यांच्यावर बंगल्यावर गेले आणि त्यांनी चालकाला सोडण्यास सांगितले. तिथून बाहेर पडल्यानंतर चालकाने पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या आजोबांविरुद्ध तक्रार दाखल केली आम्ही. त्यानुसार आम्ही सुरेंद्र अगरवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली," असेही अमितेश कुमार यांनी म्हटलं.
 

Web Title: Pune porsche accident mother of the minor requested the driver take the blame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.