"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:02 PM2024-05-21T12:02:51+5:302024-05-21T12:04:11+5:30

Pune Accident :पुण्यात आलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

Pune porsche accident Sanjay Raut angry with Pune Police Commissioner | "दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत

"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत

Pune porsche accident : पुण्यात कार अपघातात दोन तरुणांचा बळी गेल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून भरधाव मोटार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला विशेष हॉलिडे कोर्टात हजर केले होते. कोर्टाने काही तासांतच आरोपी मुलाला जामीन मंजूर केला. त्यानंतर आता याप्रकरणी मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांवर ताशेरे ओढले आहेत. पुण्यातील पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी भरधाव वेगात असणाऱ्या पोर्शे कारने दिलेल्या धडकेत अनिस आणि त्याची मैत्रिण अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला होता. अनिस आणि अश्विनी हे स्कूटीवरुन जात असताना बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नंतर त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर करताना कोर्टाने ठेवललेल्या अटींवरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तसेच संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. 

"पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? दोन निष्पाप जीवांचे बळी गेले. एक माजोरडा, दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डरचा मुलगा आहे तो दारु पित असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. तुम्ही काय रिपोर्ट दिला आहे. पुण्यातील जनतेने पोलीस आयुक्तांसमोर जाऊन आंदोलन केलं पाहिजे. हे सगळं काय चालू आहे? आमदार रवींद्र धंगेकर याविरोधात आंदोलन करत आहेत. शिवसेनाही त्यात सहभागी होईल," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

"दोन तरुण एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजोरड्यापणामुळे रस्त्यावर तडफडून मरण पावले असताना पोलीस आय़ुक्त कोणाला वाचवत आहेत? अजित पवार गटाचे आमदार तशेच वागणार. हे माणुसकी शून्य असलेले लोक आहेत. बाजूला दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला घालता. खोटा मेडिकल रिपोर्ट देता. अशा लोकांवर पुणेकरांनी बहिष्कार टाकला पाहिजे. पुण्याला असे पोलीस आयुक्त लाभले हा कलंक आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. पोलीस आयुक्त आणि न्यायालयाने दोन आखे बारा सिनेमा चालू केला आहे का? हा सर्व पैशाचा खेळ आहे. हा प्रकार म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Web Title: Pune porsche accident Sanjay Raut angry with Pune Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.