"मृतांच्या नात्याबाबत विचारुन पोलिसांनी..."; पुणे अपघात प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले ६ प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:12 AM2024-05-23T11:12:01+5:302024-05-23T11:16:40+5:30
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत.
Pune porsche accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या अपघात प्रकरणी आरोप प्रत्यारोप केले जात आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे झालेल्या अपघात एक तरुण आणि एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत भरधाव वेगात कार चालवून दोघांना चिरडलं होतं. त्यानंतर कोर्टाने अल्पवयीन आरोपीला सुरुवातीला जामीन देत नंतर त्याची रवानगी बाल सुधारगहात केली आहे. मात्र यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालून दोघांना उडवले होते. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था या दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र दोघांच्या मृत्यूनंतर अनीश आणि अश्विनी यांच्या नात्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. दुसरीकडे पोलिसांकडूनही अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाचं नातं काय आहे याबद्दल अधिक प्रश्न विचारले जात होते, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच आरोपीला विशेष वागणूक दिली असेल तर त्यांच्याविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत, असंही फडणवीस म्हटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना उलट सवाल केला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत सहा प्रश्न विचारले आहेत. "येरवडा पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाचं नातं काय आहे यासंदर्भातील प्रश्न विचारण्यातच अधिक वेळ घालवला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या दोघांना मद्यधुंदावस्थेत कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने उडवलं. दुसरीकडे या आरोपी मुलाला कथित स्वरुपात पिझ्झा आणि बर्गर देण्यात आलं," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
Officers at Yerawada police station spent more time questioning the relationship between Anish and Ashwini — the two IT professionals who were fatally knocked down by the drunk minor — while the accused was allegedly served burger and pizza.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 22, 2024
This is how the system benefits the…
तसेच आपली यंत्रणा श्रीमंत लोकांना कशाप्रकारे झुकतं माप देते हे पाहा म्हणत सहा प्रश्न विचारले आहेत.
१) अल्पवयीन मुलाला क्लबमध्ये मद्य कसं काय देण्यात आलं?
२) शोरुमने नोंदणीकृत क्रमांकाशिवाय ही कार कशी दिली?
३) ही कार वाहतूक पोलिसांच्या नजरेतून कशी सुटली?
४) या मुलाला जामीन कसा मंजूर झाला? त्याला अल्पवयीन म्हणून कोठडी का सुनावण्यात आली नाही?
५) आठ तासांनंतर अल्कोहोल चाचणी का करण्यात आली?
६) उपमुख्यमंत्री या प्रकरणात मरण पावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आले पुण्यात आले की बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी आले होते?
असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पोस्टमधून विचारले आहेत.