'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:53 PM2024-05-21T12:53:59+5:302024-05-21T13:38:30+5:30
Pune CP Amitesh Kumar : पुणे अपघात प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आपली भूमिका स्पष्ट केली.
Pune porsche accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून अल्पवयीन मुलाने आलिशान कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतरपोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपी मुलाला जामीन मंजूर केला. यामुळे पुणे पोलिसांनी कोर्टासमोर योग्य पद्धतीने आपली भूमिका मांडली नाही असा दावा करण्यात येत होता. त्यावर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणाची माहिती दिली.
पुण्याच्या कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने एका बाईकला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्याची कोर्टाने जामिनावर सुटका केली. आरोपीला जामीन मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तसेच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. तसेच आरोपीवरील कारवाईसाठी सत्र न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
"व्हिडीओमध्ये आरोपी मद्यपान करताना दिसत आहे. यासाठी त्याने ऑनलाईन पेमेंट केले. आमच्याकडे असलेल्या पुराव्यावरुन आरोपी दारु प्यायला होता हे स्पष्ट झालं आहे. ब्लड रिपोर्ट आल्यानंतर त्याबद्दल सविस्तर खुलासा करण्यात येईल. कोर्टाने आरोपी हा दारुचा व्यसनी असल्याचे नमूद केलं आहे. रविवारी आम्ही कोर्टासमोर दोन अर्ज सादर केले होते. हा गुन्हा गंभीर असल्याने सज्ञान आरोपीप्रमाणे मुलाविरुद्ध कारवाई करण्यास परवानगी मिळावी, असा एक अर्ज होता. दुसरा अर्ज हा पहिल्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत आरोपीला १४ दिवसांसाठी रिमांड होममध्ये पाठवण्याचा होता. पण कोर्टाने दोन्ही अर्ज फेटाळले," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
"पोलीस विभागाला कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जेणेकरुन जनमानसात पोलीस कारवाई करत नाही हा संभ्रम दूर व्हायला पाहिजे. जे जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. ही शासनाची भूमिका असल्याने पोलीस पहिल्या दिवसापासून याच मार्गावर चालत आहेत," असेही अमितेश कुमार म्हणाले.