"अपघातग्रस्त पोर्शे कार परत द्या"; पुणे प्रकरणात अगरवाल कुटुंबाचा कोर्टाकडे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:44 PM2024-08-19T18:44:10+5:302024-08-19T18:49:50+5:30
Pune News : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे.
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलं होतं. पुण्याच्या कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करुन भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोघांचा चिरडलं होतं. यामध्ये दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर अगरवाल कुटुंबियातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दुसरीकडे आता अगरवाल कुटुंबाने ज्या पोर्शे कारने दोन तरुणांचा जीव घेतला ती परत मागितली आहे. अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांकडून अर्ज करण्यात आला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन आरोपीने पोर्श कार भरधाव चालवत दुचाकीवरील दोघांना उडवलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अघातग्रस्त कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर २६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून २८ ऑगस्टला याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टाने पोलिसांना यावर २८ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत.
अल्पवयीन आरोपीने १९ मेच्या मध्यरात्री पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्श या कारने दुचाकीवर असलेल्या अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा यांना जोरदार धडक दिली होती. या धडकेत दोघेही मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर स्थानिकांनी आरोपीला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं होतं. मृतकाच्या मित्राने एफआयआर दाखल करण्यासाठी धाव घेतली आणि हे हायप्रोफाईल प्रकरण उजेडात आलं. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बाल न्याय हक्क मंडळासमोर हजर केलं. त्यावेळी कोर्टाने त्याला ३०० शब्दांचा निबंध, रोड सेफ्टी प्रोगाम ट्रेनिंग अशा अटी घालत १५ तासात जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलाला मिळालेल्या जामीनावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर या प्रकरणात मुलाचे आई वडील आणि आजोबांना अटक करण्यात आली होती.
दुसरीकडे, रहदारीचे नियम आणि कायदे जाणून घेण्यासाठी वाहतूक विभागाने अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी प्रोगाम ट्रेनिंग दिली. कोर्टाच्या आदेशानुसार, शनिवारी आरटीओकडून अल्पवयीन तरुणाला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग देण्यात आली. "अल्पवयीन आरोपीने सुरक्षित ड्रायव्हिंगचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात, ऑपरेशन गुप्त ठेवण्यात आले कारण यामुळे गोपनीयतेच्या समस्या निर्माण झाल्या असत्या. या प्रशिक्षण कार्यक्रमात रस्त्यावर वाहन चालवण्याची सुरक्षितता, ड्रायव्हिंग लायसन्सचे महत्त्व, रस्त्यावरील चिन्हे आणि चिन्हांचा अर्थ आणि इतर गोष्टींची माहिती समाविष्ट होती. या प्रक्रियेदरम्यान अल्पवयीन आरोपीला मैदानावरील प्रशिक्षणासाठीही नेण्यात आले होते," असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.