Pune Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात? पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:42 PM2024-08-02T12:42:01+5:302024-08-02T12:42:14+5:30
Pune Porsche Car Accident कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९०० पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले
Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी पुणेपोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या संदर्भात गुरुवारी (दि. १) पोलिस आयुक्त कार्यालयात तपासातील गुन्हे शाखेचे आधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९०० पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले जाणार आहे. या प्रकरणात विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०), शिवानी अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक बाशा मकानदार, अतुल घटकांबळे अशी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रत्यक्षदर्शींसह ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. याखेरीज, सीसीटीव्हीचे पंचनामे, टेक्निकल पुरावे, ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, एफएसएलने दिलेले अहवाल देण्यात आले आहे.
या प्रकरणात अपघात झाल्यापासून अपघातातील मुख्य अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलून आईचे नमुने वापरले. यामध्ये, झालेला आर्थिक व्यवहार त्यासंदर्भातील ऊहापोह या आरोपपत्रात पुराव्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खटल्यांचे काम विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. शिशिर हिरे पाहणार आहेत. हेच प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.