पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: अल्पवयीन आरोपीच्या काकूची कोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 12:19 PM2024-06-15T12:19:55+5:302024-06-15T12:20:18+5:30
Pune Porsche car accident case: पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाची काकू पूजा जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच पुणे पोलिस सतत पाळत ठेवून असल्याचाही दावा याचिकेत केला आहे.
मुंबई - पुणे पोर्शे कारअपघातप्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाची काकू पूजा जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच पुणे पोलिस सतत पाळत ठेवून असल्याचाही दावा याचिकेत केला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे १९ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. मुलाच्या काकूने केलेल्या याचिकेत, १९ में रोजीच मुलाला अपघातानंतर काही तासांनी अटींसह त्याच्या आजोबांच्या ताब्यात सोडण्यात आले. त्यानंतर झालेल्या सार्वजनिक गोंधळामुळे बाल न्याय मंडळाने जारी केलेल्या सुटकेच्या आदेशाला पोलिसांनी आव्हान देत २२ मे रोजी मुलाला पुन्हा ताब्यात घेत त्याला निरीक्षणगृहात पाठविण्यात आले. राजकीय अजेंड्यासह सार्वजनिक गोंधळामुळे पोलिसांना तपासापासून विचलित केले जात असून, बाल न्याय हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याचाही आरोप याचिकेत आहे.
कुटुंबीयांबाबत चुकीचे चित्र
मुलांच्या कुटुंबीयांबाबत चुकीचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. अल्पवयीन असतानाही तो सक्षम असल्याचे दाखवत त्याला बेकायदेशीर नजरकैदेत ठेवण्यात आले, ते त्याच्यासाठी हानिकारक असू शकते, असे याचिकेत म्हटले आहे. निरीक्षणगृहाऐवजी त्याला कुटुंबातील सदस्याच्या ताब्यात ठेवले पाहिजे. जे त्याची त्याची काळजी घेऊ शकतील, असेही याचिकेत नमूद आहे.
१० जून रोजी दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली. याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी मुलाची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, पुणे पोलिसांची बाजू मांडणारे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी याचिकेला आव्हान देत मुलगा निरीक्षणगृहात कायदेशीर कोठडीत असल्याचा युक्तिवाद केला.