“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 02:48 PM2024-05-29T14:48:22+5:302024-05-29T14:51:35+5:30
Vasant More News: पुण्यातील कार अपघात प्रकरणी नवीन खुलासे होत असून, विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
Vasant More News:पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता तपास सुरू आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसहित कुटुंबाची कुंडली बाहेर काढली आहे. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप करत आहेत.
डॉ. अजय तावरे यांची अटक झाली आहे. अटक झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे भरपूर नावे आहेत, मी कुणालाही सोडणार नाही, असे वाक्य उच्चारले आहे. अशावेळी एक साक्षीदार म्हणून डॉ. अजय तावरे यांची सुरक्षितता महत्वाची ठरते. पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने अजय तावरे यांच्या जीवाला धोका का होणार नाही, अशी भीती व्यक्त करत, अजय तावरे यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी एक्सवर पोस्ट करत, प्रसंगी सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले.
गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ
हिम्मत असेल तर ससूनच्या डॉ. तावरे यांनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावीत.... गरज पडल्यास वंचित बहुजन आघाडी म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही २४ तास संरक्षण देवू..., असे वसंत मोरे यांनी एक्सवर म्हटले आहे. तत्पूर्वी, विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना ही आरोपी करा. समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशा सूचनाही आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री लवकरच पुण्यात अपघात झालेल्या घटनास्थळी पाहणी करणार असल्ल्याचे सूत्रांकडून समजले आहे. तसेच या प्रकरणाबाबत पोलीस आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे.