Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:07 PM2024-07-29T19:07:48+5:302024-07-29T19:08:39+5:30

कल्याणीनगरमध्ये अपघात झाला हे तुम्हाला कोणी कळवले? अपघात झाल्यानंतर तुमचा घटनाक्रम काय होता? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केल्याचे समोर

pune porsche car accident mla sunil tingre is many questions from the police | Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र..

Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र..

किरण शिंदे

पुणे: पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Car Accident) पुणेपोलिसांवर टीका झाली. आलिशान पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन कारचालकाला पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत होता. त्यानंतर त्या परिसरातील स्थानिक आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी देखील येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यादरम्यान त्यांनी पोलिसांवर दबाव टाकत अल्पवयीन कारचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. त्यामुळे पुणे पोलीस आमदार सुनील टिंगरेंची चौकशी का करत नाहीत असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर चौकशी दरम्यान आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केल्याचेही समोर आले आहे. 

कल्याणी नगर परिसरात हा अपघात झाला त्यानंतर काही वेळातच सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्या ठिकाणी बिल्डर पुत्र असलेल्या अल्पवयीन कारचालकाला पोलिसांनी आणले होते. या संदर्भातच पुणे पोलिसांनी आमदार टिंगरे यांची चौकशी केली. या दरम्यान पोलिसांनी टिंगरे यांना त्या दिवशीचा घटनाक्रम विचारला. त्या दिवशी कल्याणीनगरमध्ये अपघात झाला हे तुम्हाला कोणी कळवले? अपघात झाल्यानंतर तुमचा घटनाक्रम काय होता? अपघात प्रकरणी तुमची भूमिका काय आहे? तुमचं ससून रुग्णालयातील डॉ अजय तावरे यांच्याशी काही बोलणं झाले होते का? यासारखे प्रश्न पोलिसांनी आमदार टिंगरे यांना विचारले. तब्बल तीन ते चार तास आमदार टिंगरेंची चौकशी सुरू होती. मात्र चार तासाच्या या चौकशीत टिंगरे यांनी काय उत्तरं दिली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

दरम्यान कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघात प्रकरणात ७ आरोपींविरोधात तब्बल ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, सुरेंद्रकुमार अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर, अश्फाक मकानदार आणि अतुल घटकांबळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील सीसीटीव्हीचे पंचनामे, टेक्निकल पुरावे, ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, आणि इतर पुरावे पुणे पोलिसांनी कोर्टाकडे सादर केली आहे. 

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे च्या पहाटे हा अपघात झाला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवत दोघांचा जीव घेतला होता. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोन तरुणांचा या घटनेत जीव गेला होता. बड्या बापाचा मुलगा असलेल्या अल्पवयीन कारचालकाने मद्याच्या नशेत कार चालवण्याचा आरोप आहे. अपघातानंतर अल्पवयीन कारचालक पळून जाण्याचा प्रयत्न होता. मात्र घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्याला पकडून मारहाण करत पोलिसांच्या हवाली केले होते.

Web Title: pune porsche car accident mla sunil tingre is many questions from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.