Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात; 'बाळा'ला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 08:16 AM2024-06-01T08:16:42+5:302024-06-01T08:17:43+5:30
कल्याणीनगर अपघात प्रकरणात 'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात ते रक्त अल्पवयीन कारचालकाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांना होता.
किरण शिंदे -
कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आता अल्पवयीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांनाही ताब्यात घेतले आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात 'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात ते रक्त अल्पवयीन कारचालकाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांना होता. याशिवाय ससून रुग्णालयात या अल्पवयीन कारचालकाला आणण्यात आल्यानंतर मोठी हेराफेरी झाली होती. या अल्पवयीन कारचालकाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी दुसऱ्याचेच सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
दरम्यान सध्या बालसुधारगृहात असलेल्या या अल्पवयीन कारचालकाकडे चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी परवानगी मागितली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. पुणे पोलीस आज २ तास अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत. या चौकशी वेळी त्याची आई शिवानी अग्रवाल यांना देखील पोलीस त्या ठिकाणी घेऊन जातील अशी शक्यता आहे.
दाखल गुन्ह्यानुसार, १९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास एका 'बाळा'ने दारू पिऊन त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरुणीला उडवले होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर पोलिसांवर तसेच अन्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. याप्रकरणी बाळाच्या वडिलांसह त्याच्या आजोबांनादेखील अटक झाली होती. त्याला मद्य पुरवणाऱ्या पब चालकासह मॅनेजरलादेखील अटक झाली होती. याप्रकरणात येरवडा पोलिसांनी दिरंगाई केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर व पोलिस कन्ट्रोल रूमला माहिती न कळवल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते.