Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला जामीन नाहीच; १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा कोर्टाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:38 PM2024-06-05T18:38:32+5:302024-06-05T18:39:13+5:30
मुलाला जामीन दिल्यास पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पोलिसांचे मत
पुणे: सध्या अल्पवयीन मुलाचे समुपदेशन सुरु आहे. त्याचे आई-वडील पोलीस कोठडी आणि आजोबा न्यायालयीन कोठडीत आहेत. मुलाला जामिनावर बाल सुधारगृहाबाहेर सोडले तर त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होउ शकतो तसेच बाहेर त्याच्या जीविताला धोका आहे, त्याला जामीन मिळाल्यास पुन्हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असे पोलिसांनीन्यायालयाला सांगत त्याचा बालसुधारगृहातील मुक्काम १४ दिवस वाढविण्याची मागणी केली. त्यानुसार विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे.एम .चौहान यांनी अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम दि. १२ जून पर्यंत वाढविला आहे. दरम्यान, मुलाने वकीलांमार्फत न्यायालयाकडे मामी किंवा मावशीला भेटण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर मुलाला गुरुवारी (दि. ६) ११ ते १ या वेळेत मावशीला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांची नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे मंडळाचे अधिकार विशेष न्यायालयाला देण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात ठेवण्याची मुदत बुधवारी संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयातील जे.एम चौहान विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) कायदा २०१५ चे कलम १५ नुसार विधी संघर्षित बालकाचे मूल्यांकन करण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व कागदपत्रे एक महिन्याच्या आत पाठविणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल होऊन १६ हून अधिक दिवस झालेले आहेत. त्यामुळे गुन्ह्यात झालेल्या तपासाची कागदपत्रे आणि त्याचा अहवाल वेळेत सादर करण्याचे पोलिसांचे नियोजन आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आणि तपासामधून अधिक पुरावा मिळण्याची शक्यता असल्यामुळे मुलाच्या मुदतवाढीबाबच्या अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी १४ जूनपर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी, अशी विनंती देखील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाकडे केली. मात्र अग्रवाल कुटुंबाचे वकील अँड. प्रशांत पाटील यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) कायदयामध्ये मुदत वाढविण्याची तरतूद नसल्याचा युक्तिवाद केला. त्यावर मुलाला सुधारण्यासाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. मुलाला जामिनावर मंडळाबाहेर सोडल्यास त्याच्या जीविताला धोका आहे. मुलाला अल्पवयीन म्हणून न संबोधता सज्ञान म्हणून वागणूक देण्याबाबत मुलाचे अँनालिसिस सुरु आहे. ते अद्याप पूर्ण झाले नाही. मुलाला व्यसन मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारी वकील मोनाली काळे यांनी सांगितले.