Pune Porsche case: अल्पवयीन मुलाचे ते रक्त आईचेच; फॉरेन्सिक अहवालातून अधिकृत निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:18 AM2024-06-06T09:18:35+5:302024-06-06T09:20:55+5:30
दरम्यान, न्यायालयाने डॉ. तावरे, डॉ. हाळनोर व ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना ७ जूनपर्यंत तर विशाल व शिवानी अग्रवाल यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे...
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे तपासणीसाठी घेण्यात आलेले रक्त हे त्याचे नसून, त्याच्या आईचेच असल्याचे फॉरेन्सिक अहवालातूनही स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली. दरम्यान, न्यायालयाने डॉ. तावरे, डॉ. हाळनोर व ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना ७ जूनपर्यंत तर विशाल व शिवानी अग्रवाल यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी दिलेले रक्ताचे नमुने हे त्याच्या आईचेच असल्याचा अहवाल प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे, असे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. आरोपींविरोधात हा पुरावा महत्त्वाचा ठरणार असल्याचा दावा पोलिसांचा आहे. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल व वडील विशाल अग्रवाल यांनी डाॅक्टर आणि ससूनचा कर्मचारी यांच्या मदतीने कट रचला. सर्वांना एकत्रित तपास करून कट कशा पद्धतीने रचला, तसेच मोबाइल सीडीआर तपासणे बाकी असून, नवीन पुरावे सातत्याने समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. यावरून न्यायालयाने अग्रवाल दाम्पत्याला १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘आई म्हणते, येथे मी मरून जाईन’
शिवानी अग्रवालला फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारातील कोठडीत (लाॅकअप) ठेवण्यात आले आहे. या कोठडीत अस्वच्छता आहे. अस्वच्छतेमुळे त्रास होत असल्याची तक्रार शिवानीने न्यायालयात केली. तिच्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली. वकिलांमार्फत न्यायालयात तक्रार नोंदवावी, असे आदेश देण्यात आले.
‘नोटिशीला उत्तर देण्यासाठी कागदपत्रे मिळावीत’
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलल्याप्रकरणी ‘ससून’च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबईच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी डॉ. हाळनोर यांना कागदपत्रांची गरज असून, ती कागदपत्रे ससूनच्या बी. जे. मेडिकल येथील त्यांच्या रूममध्ये आहेत. ही रूम सील करण्यात आली आहे. मोबाइलही पोलिसांच्या ताब्यात आहेत. रूममधील कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी हाळनोर याच्या वकिलांनी केली. डॉ. अजय तावरे यांची बाजू वकील ॲड. सुधीर शहा व विपुल दुशिंग यांनी मांडली.