Pune Porshe accident: २ कार, ४ शहरं अन् लपाछपीचा खेळ; विशाल अग्रवालनं काय-काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:55 PM2024-05-22T13:55:58+5:302024-05-22T14:09:01+5:30

अल्पवयीन पोराने बेदरकारपणे पोर्श कार चालवून दुचाकीला उडवलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या पोराला लगेच जामीन मिळाला...

Pune Porshe accident 2 cars, 4 cities and a game of hide and seek; What did Vishal Agarwal do? | Pune Porshe accident: २ कार, ४ शहरं अन् लपाछपीचा खेळ; विशाल अग्रवालनं काय-काय केलं?

Pune Porshe accident: २ कार, ४ शहरं अन् लपाछपीचा खेळ; विशाल अग्रवालनं काय-काय केलं?

- किरण शिंदे

पुणे : गुन्हा दाखल होताच आपल्यालाही आता अटक होऊ शकते याची खात्री विशाल अग्रवालला होती. त्यामुळेच की काय त्याने पुढचा प्लॅन आखला आणि अंमलातही आणला. पोलिसांना हुलकावणी देत तो या शहरातून त्या शहरात फिरत होता. मात्र 'कानून के हात लंबे होते है' या म्हणीप्रमाणे पोलिसांनीही लपत छपत फिरणाऱ्या विशाल अग्रवालला बेड्या ठोकल्याच. नेमकं काय झालं? फरार काळात बिल्डर विशाल अग्रवाल नेमका होता कुठे? तर विशाल अगरवाल छत्रपती संभाजी नगर येथील एका छोट्या लॉजमध्ये लपला होता.

अल्पवयीन पोराने बेदरकारपणे पोर्श कार चालवून दुचाकीला उडवलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या पोराला लगेच जामीन मिळाला. मात्र या पोराच्या बापावर अर्थात बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते अशी कुणकुण लागल्यानंतर विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाला होता. गुन्ह्याचं गांभीर्य वाढल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस विशाल अग्रवालचा शोध घेत होते. गुन्हे शाखेची १० ते १२ पथक पुणे शहर आणि आजूबाजूला असलेल्या त्याच्या मालमत्तावर जाऊन त्याला शोधत होती. मात्र विशाल अग्रवाल पोलिसांना चकवा देत होता.

पोलिसांना चकवा देण्यात यश -

अटक टाळण्यासाठी विशाल अग्रवाल सर्वप्रथम दौंड शहरात गेला. तेथील एका फार्म हाऊसवर काही काळ थांबल्यानंतर तो कोल्हापूरला गेला. कोल्हापुरात गेल्यानंतर एका मित्राला भेटला. तेथून त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ड्रायव्हरला गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने पाठवलं. दरम्यान या गाडीची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक या गाडीचा पाठलाग करत होतं. ही गाडी शेवटी त्यांना मुंबईत सापडली. मात्र गाडीत विशाल अग्रवाल नव्हता. इथे तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला होता. दरम्यान कोल्हापूरमध्ये काही काळ थांबलेल्या विशाल अग्रवाल याने एका मित्राची गाडी घेतली आणि चालकासह तो छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाला. यादरम्यानच्या कालावधीत त्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली. लोकेशनवरून पोलीस माग काढतील या भीतीने त्याने मोबाईलही बंद ठेवला होता. कुटुंबीयांनाही त्याने मुंबईला जात असल्याची चुकीची माहिती दिली.

चालकाला विश्वासात घेतलं अन् विशाल अग्रवाल मिळाला-

मात्र सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. त्यानुसार विशाल अग्रवाल हा मित्राच्या गाडीतून छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. संभाजीनगरच्या पोलिसांनाही याची कल्पना दिली. पोलिसांनी संभाजीनगरात ती कार शोधण्यास सुरुवात केली. एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर पोलिसांना ही कार सापडली. मात्र हॉटेलमध्ये विशाल अग्रवाल नव्हताच. या हॉटेलमध्ये होता त्याचा चालक. चालकाला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली नंतर विशाल अग्रवालचं खरं लोकेशन समोर आलं. एका छोट्याशा लॉजमध्ये तो मुक्कामाला थांबला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पुण्यात आणलं.

राज्यात संतापाची लाट -

खरंतर बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलान बेदरकारपणे कार चालवत दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन असणाऱ्या मुलाला विशाल अग्रवालने पोर्शे कार चालवण्यासाठी दिली होती. मात्र हीच कार त्याने मद्याच्या नशेत वेगाने पळवली आणि दोघांचा बळी घेतला. आणि याच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर लपत छपत फिरणाऱ्या विशाल अग्रवालला बेड्या ठोकल्या.

Web Title: Pune Porshe accident 2 cars, 4 cities and a game of hide and seek; What did Vishal Agarwal do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.