Pune: दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन, मनोरमा खेडकरच्या जामीनावर सोमवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:51 PM2024-07-26T21:51:16+5:302024-07-26T21:51:48+5:30
Pune News: मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मनोरमा खेडकरसह आरोपी असलेल्या दिलीप खेडकर यांना न्यायालयाने तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला; तर मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.
पुणे - मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मनोरमा खेडकरसह आरोपी असलेल्या दिलीप खेडकर यांना न्यायालयाने तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला; तर मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी हा आदेश दिला. दिलीप खेडकरांनी तक्रारदार व साक्षीदारांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क करून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये, गुन्ह्याच्या तपासात यंत्रणेला मदत करावी, सात दिवसांच्या आत त्यांनी स्वतःचा व जवळच्या दोन नातेवाइकांचा कायमस्वरूपी पत्ता आणि मोबाइल क्रमांक तपास अधिकारी किंवा संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावा, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. हा गुन्हा घडल्यानंतर वर्षभराहून अधिक काळाने पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दिलीप खेडकरच्या सहआरोपीवर आहे, असे नमूद करत न्यायालयाने दिलीप खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शिक्कामोर्तब केले.
या प्रकरणात मनोरमा खेडकर यांनी जामीनासाठी, तर दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अॅड. सुधीर शहा यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी अॅड. सुधीर शहा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.