खंडित वीजपुरवठ्याने उडवली पुणेकरांची झोप
By Admin | Published: June 6, 2016 12:53 AM2016-06-06T00:53:02+5:302016-06-06T00:53:02+5:30
पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांना पूर्वमोसमी पावसाने शनिवारी मध्यरात्री दिलासा दिला़ पण, पाऊस सुरूहोताच जवळपास अर्ध्या पुण्यातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पुणेकरांची झोप उडाली़
पुणे : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांना पूर्वमोसमी पावसाने शनिवारी मध्यरात्री दिलासा दिला़ पण, पाऊस सुरूहोताच जवळपास अर्ध्या पुण्यातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पुणेकरांची झोप उडाली़ जवळपास दोन तास झालेल्या या पावसाची वेधशाळेत १६़५ मिमी इतकी नोंद झाली आहे़ धरण परिसरातही चांगला पाऊस झाला़
शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ पाऊस येईल असे वाटत असतानाच आकाश निरभ्र होत असे़ हवेतील आर्द्रताही वाढल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता़ रात्री नऊ वाजल्यानंतर काही ठिकाणी पावसाची हलकी सर येऊन गेली़ मध्यरात्री साडेबारानंतर काही भागात पावसाची एखादी सर येत होती़ नंतर दोनच्या सुमारास शहरात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली़ काही वेळातच रस्त्यावरून पाणी वाहू लागले़ जसा पाऊस सुरूझाला त्याच वेळी अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला़ एका बाजूला
पावसाचा आवाज आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने गाढ झोपेत असलेल्या शहरवासीयांना जाग आली़ कोथरूड, सिंहगड रोड, गोखलेनगर, पर्वती दर्शन, सहकारनगर, पौड रोड व अन्य परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपले
बारामती : बारामती शहर व परिसरात शनिवारी (दि. ४) रात्री विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी साठलेल्या अवस्थेत होते.
सलग दुसऱ्या दिवशी बारामती शहरात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते.
रात्री ९नंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बारामतीकरांनी अनुभवला.