Pune Railway Station: पुणे रेल्वे विभागातून ८ महिन्यांत ६४ लाख प्रवासी वाढले; तुलनेने गाड्यांची संख्या मात्र कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:29 IST2024-12-25T17:28:14+5:302024-12-25T17:29:46+5:30
प्रवाशांच्या तुलनेत गाड्या न वाढल्याने गर्दीमध्ये धक्के खात प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे

Pune Railway Station: पुणे रेल्वे विभागातून ८ महिन्यांत ६४ लाख प्रवासी वाढले; तुलनेने गाड्यांची संख्या मात्र कमी
पुणे : पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या एक्स्प्रेस, लोकल, डेमू, पॅसेंजर या सर्व गाड्यांच्या सबर्बन व नॉन-सबर्बन प्रवासी संख्येत गेल्या वर्षीपेक्षा मोठी वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या आठ महिन्यांत पुणे रेल्वे विभागातून ३ कोटी ७२ लाख इतक्या प्रवाशांनी प्रवास केला होता, तर २०२४-२५ मध्ये गेल्या आठ महिन्यांत ४ कोटी ३६ लाख इतक्या प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आठ महिन्यांत ६४ लाख ५८ हजार इतके प्रवासी वाढले. यामुळे पुणे रेल्वे विभागाला १८० कोटींचे जादा उत्पन्न मिळाले आहे.
रेल्वेचे तिकीट दर कमी असल्याने प्रवाशांकडून कायम पसंती देण्यात येते. पुणे विभागातून दिवसेंदिवस प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे; परंतु सुविधा मात्र वाढताना दिसून येत नाही. पुणे विभागातून दररोज २०० रेल्वे गाड्या धावतात. दीड लाखावर नागरिक प्रवास करतात. गेल्या आठ महिन्यांत पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ६४ लाखांची वाढ झाली आहे. तुलनेने प्रवासी गाड्या मात्र वाढलेल्या नाहीत. त्यामुळे गर्दीमध्ये धक्के खात प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. कोरोनामुळे २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांत रेल्वेकडे प्रवाशांनी काही प्रमाणात पाठ फिरविली होती; परंतु २०२३ पेक्षा चालू वर्षी मात्र रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्न या दोन्हींची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
रेल्वे गाड्या वाढविणे गरजेचे
पुण्यातून प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणा या राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यात बिहार, पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्यांना बाराही महिने गर्दी असते. या भागात जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरक्षित डब्यांमध्ये प्रवासी घुसतात. त्यामुळे दोन महिने आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या भागात रेल्वेगाड्या वाढविण्याची गरज आहे.
विस्तार झाल्याचा फायदा...
एप्रिल २०२४ पासून पुणे रेल्वे विभागात पूर्वीच्या सोलापूर विभागात समावेश असलेला दौंड-अहिल्यानगर या लोहमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे विभागात जवळपास २५० किमीचा महामार्ग समावेश झाला. त्यामुळे पुणे विभागातील रेल्वे स्थानकाची संख्या वाढली. शिवाय यंदा अनेक मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासीसंख्या वाढण्यासाठी फायदा झाला आहे. प्रवासी संख्या वाढल्यामुळे अनेक मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आले आहे. त्याचा फायदा प्रवासी आणि रेल्वेला होत आहे. प्रवासी वाढल्यामुळे उत्पन्न देखील वाढले आहे. - डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग
(प्रवासी संख्या लाखांत)
महिना : २०२३ २०२४
एप्रिल ४४.०३ ५१.९१
मे ४६.८० ५३.५७
जून ४३.९३ ५३.४३
जुलै ४७.६० ५५.१९
ऑगस्ट ४९.२३ ५६.४४
सप्टेंबर ४६.४० ५६.३०
आक्टोबर ४७.०९ ५४.१७
नोव्हेंबर ४६.९९ ५५.६४
एकूण प्रवासी संख्या ३७२.०७ ४३६.६५
सन २०२३-२४ मध्ये आठ महिन्यांतील उत्पन्न ---- ७९१ कोटी १० लाख
सन २०२४-२५ मध्ये आठ महिन्यांतील उत्पन्न ---- ९७१ कोटी ९० लाख