पुणे रेल्वे स्थानक नाबाद ९४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:59 AM2018-07-28T03:59:25+5:302018-07-28T03:59:52+5:30
केक कापून वर्धापन दिन साजरा
पुणे : भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करण्याच्या इराद्याने आलेल्या इंग्रजांनी कालांतराने देशाचा चेहराच बदलवून टाकला. पुण्यात आज दिमाखात उभ्या असलेल्या ऐतिहासिक पुणे रेल्वे स्थानकाचा देखील यात समावेश होता. २७ जुलै १९२५ रोजी हे स्थानक उभारण्यात आले. बघता बघता या इमारतीला ९४ वर्षे पूर्ण झाली. शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शुक्रवारी (दि. २७) पुणे रेल्वे स्थानकाच्या वास्तूने ९४ व्या वर्षात पदार्पण केले. वाढदिवसाचा कार्यक्रम रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला. याप्रसंगी कृष्णनाथ पाटील, ए. के. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. पुणे स्टेशनला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा प्राप्त झाला आहे. या स्टेशनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. इतक्या वर्षात या इमारतीचे ऐतिहासिक रूप तसेच ठेवण्यात आले आहे. पुणे स्टेशनची इमारत ही पुणे शहराची आणि पुणेकरांची एक ओळख म्हणून पाहिली जाते. १९३० साली पुणेकर तसेच मुंबईकरांच्या जिवाची डेक्कन क्वीन रेल्वे सुरू करण्यात आली. इतक्या वर्षांनंतर डेक्कन क्वीन या दोन शहरांना जोडण्याचे काम करीत आहे. मास्टर ॠषी गुप्ता यांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी कृष्णनाथ पाटील, ए. के. पाठक, स्टेशन डायरेक्टर सुनील डोबाळे, डेप्युटी स्टेशन प्रबंधक गुरुराज सोनकांबळे, फढऋ मंजू मनिराग, रश्मी दळवी, गौतम ओहळ, महेंद्र सिंग, राममोहन मुरली मीना उपस्थित होते. इंग्रजांच्या काळापासून पुणे हे लष्करासाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरू करणे आवश्यक होते.
इमारतीचा खर्च होता ५ लाख ७९ हजार
सन १९२२ मध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या इमारतीचा आराखडा पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मुख्य अभियंता जेम्स बर्कले यांच्या नियोजनाखाली बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर २७ जुलै १९२५ रोजी मोठ्या धूमधडाक्यात पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये इतका खर्च आला होता.