पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा फक्त कागदावरच..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:24 PM2019-12-19T19:24:36+5:302019-12-19T20:27:23+5:30
रेल्वे प्रशासनाकडून केवळ कागदावरच आराखडे तयार
पुणे : मागील काही वर्षात पुणेरेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, स्थानकात १२ मेटल डिटेक्टर तर ५ सामान तपासणी स्कॅनरची गरज असताना सध्या केवळ दोन डिटेक्टर व एकच स्कॅनर आहे. तसेच आणखी ६३ सीसीटीव्ही कॅमेरेही गरजेचे आहेत. पण ही ‘गरज’ सध्या केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात कधी येणार, याची खात्री रेल्वे अधिकाऱ्यांनाही नाही.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या नवनियुक्त व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुणे रेल्वे स्थानकासह विभागातील विविध स्थानकांवर सुरक्षेच्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, स्कॅनरचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एकात्मिक सुरक्षा आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत सुरक्षेसाठी आवश्यक बाबी नमुद करण्यात आल्या आहेत. या आराखड्यानुसार पुणे रेल्वे स्थानकाला एकुण १२ मेटल डिटेक्टर, ५ स्कॅनर तर ६३ सीसीटीव्ही कॅमेराची गरज आहे. सध्या स्थानकात असलेले मेटल डिटेक्टर, स्कॅनर खुप जुने आहेत. त्यामुळे ते सतत बंद असतात. पुणे विभागामध्ये सध्या केवळ ४ मोठ्या स्थानकांवर सीसीटीव्ही आहेत. आणखी १८ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. विभागात ६०० हून अधिक कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. मागील काही वर्षांपासून हीच स्थिती असताना रेल्वे प्रशासनाकडून केवळ कागदावरच आराखडे तयार केले जात आहेत. ही कामे टप्याटप्याने केली जाणार असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याचबरोबर पुणे स्टेशन ते शिवाजीनगर रेल्वे मार्गाच्या परिसरामध्ये ७ अधिकृत तर ७ अनधिकृत ठिकाणांहून प्रवासी येतात. त्यापैकी २ अनधिकृत ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. उर्वरीत ५ ठिकाणेही लवकरच बंद केली जाणार आहेत. प्रवाशांची सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी ही पावले उचली जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
------------------