Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा अन् जिल्ह्यातील ३ तालुके तहानलेलेच
By नितीन चौधरी | Published: August 3, 2023 05:46 PM2023-08-03T17:46:36+5:302023-08-03T17:46:59+5:30
पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला तरी पुरंदर, बारामती व हवेली या ३ तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने येथील पेरण्याही रखडल्या
पुणे : गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला असला तरी पुरंदर, बारामती व हवेली या तीन तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने येथील पेरण्याही रखडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला असून चार तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ६७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात जून, जुलैत चार तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर दोन तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी थोडा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित आठ तालुक्यांत मात्र सरासरी पावसाच्या तुलनेत ७५ टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ३ ऑगस्टपर्यंत ३८७.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. सरासरी पाऊस ५०६.८ मिमी असून पडलेला पाऊस हा सरासरीच्या ७६.५ टक्के इतका आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये भोर, वेल्हे, मावळ आणि आंबेगाव या चार तालुक्यांचा तर, सरासरीच्या जवळ पोहाेचलेल्या तालुक्यांमध्ये खेड व मुळशी या तालुक्यांचा समावेश आहे. मावळ तालुक्याची दोन महिन्यांचा सरासरी पाऊस ७२३.९ मिमी असून आतापर्यंत १२४६.९ मिमी अर्थात १७२ टक्के पाऊस झाला आहे. त्या खोलाखाल भोर तालुक्यात ११९ टक्के पाऊस झाला आहे. आंबेगाव व वेल्हे तालुक्यात प्रत्येकी ११० व १०० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पुरंदर तालुक्यात केवळ ११०.६ मिमी अर्थात सरासरीच्या (२४८.४ मिमी) ४४.५ टक्के पाऊस झाला आहे. तर बारामती तालुक्यातही आतापर्यंत केवळ ४८.२ टक्के (७३.८ मिमी) पाऊस झाला आहे. हीच स्थिती हवेली तालुक्याचीही असून येथे आतापर्यंत केवळ ४७.४ टक्केच (१८४.५ मिमी) पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण असमान असल्याचा परिणाम पेरण्यांवरही झाला आहे. पुरंदर, बारामती व हवेली तालुक्यात अद्यापही पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. पाऊस पुरेसा नसल्याने काही गावांत पेरण्याच झाल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने ३१ जुलैपर्यंत झालेल्या पेरण्यांच्या आकडेवारीनुसार हवेली तालुक्यात आतापर्यंत केवळ १,८८२ हेक्टर अर्थात सरासरीच्या ३८ टक्केच पेरणी झाली आहे. तर शिरूर तालुक्यातही ३८ टक्केच अर्थात सरासरीच्या १२ हजार ८८२ हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. बारामती तालुक्यात ४३ टक्के (४,६७९ हेक्टर) तर पुरंदर तालुक्यात ५३ टक्के (१०,१७५ हेक्टर) पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असून आतापर्यंत ३९ हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र २० हजार ९८२ हेक्टर इतके आहे. त्यामुळे प्रत्यक्ष झालेली पेरणी सरासरीच्या १७९ टक्के इतकी आहे. भात लागवड आतापर्यंत ४३ हजार ३९२ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या ७३ टक्के पेरणी झाली आहे. येत्या आठवड्यात भाताची पुनर्लागवडीची कामे पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याचा परिणाम बाजरीच्या पेरणीवर झाला असून आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३३ टक्के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ खेड तालुक्यात १०० टक्के अर्थात २३ हजार ४१२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
''बारामती, पुरंदर, हवेली व शिरूर या तालुक्यांत पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. काही तालुक्यांत केवळ भीज पाऊस आहे. त्यामुळे पिके तग धरून आहेत. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे''
तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिमी) पेरणी (टक्के)
हवेली १८४.५ ३८
मुळशी ८२७.९ ७९
भोर ७१६.३ ७०
मावळ १२४६.९ ९०
वेल्हे १५२२.१ ८६
जुन्नर २३९.९ ७५
खेड २८०.२ १००
आंबेगाव ४३९.० ६१
शिरूर १०६.३ ३८
बारामती ७३.८ ४३
इंदापूर ११९.७ ७४
दौंड १०५.५ ७३
पुरंदर ११०.६ ५३
एकूण ३८७.९ ६७