खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे आदेश; पुण्यात पुन्हा पाणी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 02:07 PM2024-08-04T14:07:51+5:302024-08-04T14:08:18+5:30
Pune Rain Alert, Flood: धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तेथील पाण्याची आवक वाढू लागली आहे. यामुळे धरणांची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. अशातच धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तेथील पाण्याची आवक वाढू लागली आहे. यामुळे धरणांची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून दिवसभरात खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
यामुळे दिवसभरात मोठ्या प्रमाणावर धरणाचे पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले की, घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिलेला आहे. रात्रीपासूनच नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. येरवडा व पिंपरी चिंचवड तसेच पुण्यातील विविध भागातील नागरिकांना स्थलांतरित देखील करण्यात आले आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
तर पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज पुन्हा एकता नगरमध्ये पाणी साचत असल्याचे म्हटले आहे. धरण दिवसभरात खाली करा, अशी विनंती करण्यात आली आहे. रिव्हर फ्रंटमुळे काही अडचण होत आहे का हे आम्ही तपासत आहोत. नदी सुधार प्रकल्प इन्व्हरमेंट कमिटीची, एलिगेशन डिपार्टमेंटची मान्यता घेऊन सुरू केला आहे. नागरिकांच्या तक्रारी तपासून पुन्हा एकदा तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले.
अजित पवारांनी पुण्यातील जलसंपदा विभागाला धरणातील पाणी खाली करण्याचे आदेश दिले आहेत. धरणातील ६५ टक्क्यांपर्यंत पाणी खाली करावे, पुन्हा रात्रभरात पाऊस झाल्यास धरण भरेल असे अजित पवार म्हणाले आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.