Pune Rain Alert : अवकाळीचा तडाखा आजही, हवामान विभागाचा अंदाज, त्यानंतर तापमानात वाढ होणार
By नितीन चौधरी | Updated: April 3, 2025 18:59 IST2025-04-03T18:57:46+5:302025-04-03T18:59:10+5:30
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाली पावसाने धुमाकुळ घातला

Pune Rain Alert : अवकाळीचा तडाखा आजही, हवामान विभागाचा अंदाज, त्यानंतर तापमानात वाढ होणार
पुणे : मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्राच्या वातावरणाच्या खालील स्तरावर तयार झालेल्या चक्राकार स्थितीमुळे आर्द्रता तयार झाली आहे. दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारीही (दि. ४) काही ठिकाणी मेघ गर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, वातावरण निरभ्र राहील असा अंदाज आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाली पावसाने धुमाकुळ घातला असून काढणीला आलेल्या रब्बी पिकांना चांगलाच तडाखा दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हमावामनतज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावरील वातावरणाच्या खालील उष्णकटिबंधीय पातळीवर एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दक्षिण कर्नाटक ते नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत मराठवाड्यावर एक दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशवर खालच्या उष्णकटिबंधीय पातळीवरही असाच कमी दाबाचा पट्टा असून आग्नेय अरबी समुद्रावर चक्राकार स्थिती दक्षिण केरळपर्यत तयार झाली आहे. या प्रणालींच्या प्रभावामुळे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यावर येत आहेत. दिवसाचे तापमान अधिक असल्याने तसेच या बाष्पामुळे मोठे ढग तयार होत आहेत. त्यामुळे दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
विभागाने दिलेल्या अंदाजनुसार शुक्रवारीही राज्याच्या कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणात ९ एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून राज्याच्या अन्य भागात मात्र, आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे, असेही सानप यांनी सांगितले.