Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 01:17 PM2024-08-24T13:17:32+5:302024-08-24T13:17:51+5:30
ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र १५ ऑगस्टनंतर तो पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे
पुणे : पुण्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. नेमका शनिवार रविवार बघून संततधार सुरु झाल्याने नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले आहे. पुढील दोन तीन दिवस पुण्यात पाऊस होणार असल्याचे हवामान विभाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळी भारतीय हवामान विभागाने पुढील ३-४ तासांत अहमदनगर नांदेड पुणे व रायगड या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण असमान आहे. शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. पण आज मात्र दुपारीच तीन वाजता सरी कोसळल्या. श्रावण महिना सुरू असल्याने उन्ह-पावसाचा खेळ पुणेकरांना पहायला मिळत आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत पुणे शहरात चांगला पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे सर्व धरणंही भरून गेली. मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला आणि पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पण पंधरा ऑगस्टनंतर मॉन्सून सक्रिय झाला आणि पुण्यात सायंकाळी जोरदार पाऊस होत आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग सुरु
खडकवासला धरणातून दुपारी १ वा. मुठा नदी पात्रात ६ हजार ४४६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो वाढवून दुपारी २ वा. मुठा नदी पात्रात ८ हजार ७३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी ३ वा. मुठा नदी पात्रातून १२ हजार ९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.