Pune Rain : पुणे शहरात धुवांधार पावसाची हजेरी; पुढील काही तासांमध्ये 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 07:06 PM2021-05-29T19:06:32+5:302021-05-29T19:23:10+5:30
पुणे शहरात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला.
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत होता. मात्र, शनिवारी सायंकाळी आकाशात ढग भरून आले होते. त्यानंतर साडे सहाच्या सुमारास धुवांधार पावसाने हजेरी लावली.शहरातील डेक्कन, कर्वेनगर, वारजे माळवाडी, धायरी, कोथरूड, सिंहगड रस्ता या परिसरासह पिंपरी चिंचवड ,पुणे जिल्ह्यात देखील पावसाच्या जोरदार सरींनी कोसळत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनीही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
Nowcast warning at 1500 Hrs Thunderstorm with lightning and mod to intense spells of rain, gusty winds 30-40kmph likely to occur at isol places in districts of Sangli,Pune,Beed,Solapur nxt 3 hrs. Tk precautions while moving out. Don't stand nearby large trees.@RMC_Mumbai
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 29, 2021
विजांच्या कडकडाटासह तीन तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहील. सांगली, पुणे, बीड, सोलापूरमध्ये येत्या तीन तासात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका, असं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
खेडचा पूर्व तसेच शिरुरचा पश्चिम भाग : वादळी वाऱ्याने नागरिकांत घबराट; मात्र पावसाने दिलासा
शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२९) मान्सूनपूर्व वळवाच्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे हंगामातील पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने शेतात पाणीच - पाणी केले. पावसापूर्वी वादळी वाऱ्याने परिसरात थैमान घातल्याने नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. सुसाट वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे मान्सून पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
गेल्या चार - पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने उकाडा अधिक वाढत होता. वाढत्या उकाड्याचे पावसात रुपांतर होईल असे अपेक्षित होते. अखेर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात जमून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी विजांच्या कडकडाटात बरसण्यास सुरुवात केली. एक तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली