मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:47 PM2024-09-25T23:47:15+5:302024-09-25T23:55:50+5:30
Pune Rain : उद्या (गुरुवारी) पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे : भारतीय हवामान विभागाने उद्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
आज दिवसभर पुणे जिल्ह्यात संततधारा होत्या. अनेक धरणे १०० टक्के भरल्याने धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवला आहे. उद्या (गुरुवारी) पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २६ सप्टेंबरला सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्याकरीता उद्या २६ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली असून धरणक्षेत्रात सततधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.