Pune Rain : रात्री घरातून निघालो अन् सकाळी घरच राहिलं नव्हतं, जीव तेवढा वाचला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:29 AM2019-09-26T10:29:26+5:302019-09-26T10:29:32+5:30
Pune Rain : आंबिलओढा पुरग्रस्तांच्या डोळ्यातील पाणी आटेना
पुणे : रात्री पाऊस सुरू झाला तो पिण्याचं काय तोंडचंपण पाणी पळवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ही कहाणी आहे पुण्यातले आरती आणि अविनाश हरणे दांपत्याची. पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दांडेकर पुलावरील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांची वसाहत असलेल्या या भागातील अनेकांची घरे, त्यातले सामान, कागदपत्रे डोळ्यासमोर वाहून गेली आणि उरले फक्त अश्रू.
साने गुरुजी शाळेच्या मागील भागात राहणाऱ्या हरणे यांच्या घराला ओढ्यातल्या पाण्याने भले मोठे भगदाड पडले आहे. या एकाच खोलीत नवरा, बायको, दोन मुले आणि त्यांची आजी असे पाच जण राहत होते. रात्री साडेनऊ वाजता त्यांना घरामागील नाला जास्त जोरात वाहतोय असं त्यांच्या लक्षात आलं. काही करेपर्यन्त जवळच्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घराचा उंबरा तोडून त्यांना बाहेर काढले. रात्र चिंतेत आणि हताशपणे काढल्यावर त्यांनी सकाळी जाऊन बघितले तर शिल्लक होते फक्त अवशेष. ही अवस्था सांगताना त्यांच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. आता सरकारी मदत येईल, महापालिका कर्मचारी येतील या आशेवर ते थांबले आहेत.
याबाबत आरती म्हणाल्या की, 'कागदपत्रे, अडचणीत गरज म्हणून केलेले दागिने, फ्रीज, टीव्ही सारे वाहून गेले. जीव सोडला तर काही शिल्लक नाही'.