Pune Rain: पुण्यात यंदा जोरदार बरसला; ४ महिन्यांत तब्बल १२२ टक्के पाऊस, मावळात सर्वाधिक पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:02 PM2024-10-03T15:02:17+5:302024-10-03T15:02:36+5:30
पुणे जिल्ह्यातील धरणेही पूर्ण भरली असून शेतीलाही पुरेसे पाणी मिळाले
पुणे : यंदा मान्सून जिल्ह्यात भरभरून बरसला असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १२२ टक्के अर्थात १०५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी केवळ ७६ टक्के अर्थात ६५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सप्टेंबर महिन्यात मात्र, जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडला असून सुमारे ८७ टक्के अर्थात १३५ मिलिमीटर पावसाची नोंद कृषी विभागाने केली आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये १३० टक्के अर्थात ९१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनने यंदा वेळेत हजेरी लावल्याने जिल्ह्यात पेरण्याही वेळेत झाल्या. जिल्ह्यात खरिपाखालील सरासरी लागवड क्षेत्र १ लाख ९५ हजार ७१० हेक्टर असून, यंदा वेळेवर आलेल्या पावसामुळे हे क्षेत्र जवळपास दुप्पट झाले आहे. यंदा जिल्ह्यात ३ लाख ९० हजार २२७ हेक्टरवर खरिपाच्या पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात ९१७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. वास्तविक या तीन महिन्यांमधील जिल्ह्याची सरासरी ७०५.१ मिलिमीटर इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात या तीन महिन्यांत सरासरीच्या १३० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सप्टेंबरअखेर १३५ मिमी पाऊस
सप्टेंबरची जिल्ह्याची सरासरी १५६.५ मिलिमीटर असून ३० सप्टेंबरअखेर जिल्ह्यात १३५.६ मिलिमीटर अर्थात ८६.६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. चारही महिन्यांचा विचार केल्यास जिल्ह्यात सरासरी ८६१.६ मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात जिल्ह्यात १०५२.८ मिलिमीटर अर्थात १२२.२ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी केवळ ६५५.१ अर्थात ७६ टक्के पाऊस पडला होता.
२१९ टक्के पावसाची नाेंद
यंदा सर्वाधिक २५८७.३ मिलिमीटर अर्थात २१९.१ टक्के पावसाची नोंद मावळ तालुक्यात करण्यात आली आहे. त्या खालोखाल भोर तालुक्यात १७७९.५ मिलिमीटर अर्थात १८० टक्के पाऊस पडला आहे. आंबेगाव तालुक्यात १०९४.७ मिलिमीटर अर्थात १५८.५ टक्के पाऊस पडला आहे. तर सर्वांत कमी ४८७ मिलिमीटर अर्थात १०४ टक्के पाऊस पुरंदर तालुक्यात झाला आहे.
तालुकानिहाय पाऊस
तालुका पाऊस (मिमी) टक्के
पुणे शहर १०२१.३ १६८.७
हवेली ७९३.१ १११.९
मुळशी २०७५.९ १३२
भोर १७७९.५ १८०.१
मावळ २५८७.३ २१९.१
वेल्हे ३५६४.४ १४८.६
जुन्नर ६२४.६ १०५.१
खेड ८०२.६ १४५.१
आंबेगाव १०९४.७ १५८.५
शिरूर ५०५.६ १३१
बारामती ४८४.८ १२४.६
इंदापूर ५७६.८ १३५.१
दौंड ५३६.२ १४९.५
पुरंदर ४८७ १०४.६
एकूण १०५२.८ १२२.२