Pune Rain: पुण्यात 2 तासांत रेकॉर्ड ब्रेक; तुफानी पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, जनजीवनही विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:54 PM2024-09-26T14:54:01+5:302024-09-26T14:54:26+5:30

पुणेकरांचे अतोनात हाल झाले असून काही भागांत पाणी शिरल्याच्या तसेच नऊ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत

Pune Rain: Record break in 2 hours in Pune; Due to the torrential rains, the roads are flooded and life is disrupted | Pune Rain: पुण्यात 2 तासांत रेकॉर्ड ब्रेक; तुफानी पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, जनजीवनही विस्कळीत

Pune Rain: पुण्यात 2 तासांत रेकॉर्ड ब्रेक; तुफानी पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, जनजीवनही विस्कळीत

पुणे: शहरात दोन वर्षांपूर्वी केवळ दोन तासांत १०५ मिलिमीटर पाऊस झाल्याच्या आठवणी बुधवारी (दि. २५) पुन्हा ताज्या झाल्या. शहरात बुधवारी दुपारी साडेतीननंतर दोन तासांत तब्बल १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परतीच्या पावसाने सलग चौथ्या दिवशी जोरदार हजेरी लावल्याने शिवाजीनगरसह शहराच्या मध्य भागातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. परिणामी, शहरातील रस्त्यांवर झालेल्या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार शहरात काही भागांत पाणी शिरल्याच्या तसेच नऊ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

शहरात दुपारपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत होता; मात्र तसेच वातावरणात यापूर्वीच असलेल्या आर्द्रतेमुळे आकाशात मोठ्या प्रमाणआत ढगांची निर्मिती झाली होती. यामुळे दुपारीच सायंकाळचा अनुभव पुणेकरांनी घेतला. साडेतीननंतर प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर मोठा असल्याने काही मिनिटांतच रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले. परिणामी शिवाजीनगर; तसेच शहराच्या मध्य भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, सिमला ऑफिस चौक, महापालिका चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

शिवाजीनगर पावसाचा जोर जास्त होता. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगरला १२४ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल शहराच्या पूर्व भागात विशेषत: वडगाव शेरीत ७१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर कोरेगाव पार्कातही ६३ मिलिमीटर पाऊस पडला. तर चिंचवडमध्येही जोरदार पाऊस झाला असून येथे १२७.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता.

दुपारच्या सत्रात असलेल्या शाळांनाही याचा फटका बसला. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळांमधून सोडण्यात आले. विद्यार्थ्यांना बस तसेच रिक्षांपर्यंत सुरक्षित पोचविण्यासाठी शिक्षकांनी, तसेच कर्मचाऱ्यांनी मदत केली. जोरदार पावसासह विजांचा कडकडाट, तसेच सोसाट्याचा वारा असल्याने शहरात नऊ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. त्यात हडपसर भाजीमंडई, काळे बोराटेनगर, पौड रस्त्यावरील चर्च, कर्वेनगरमधील कृष्णा हॉस्पिटल, दत्तवाडीतील पेगासेस हेल्थ क्लब, औंधमधील म्हसोबानगर, वडगावशेरी येथील कस्तुरबा वसाहत, हडपसरमधील महादेवनगर हडपसर बस डेपो, धनकवडीमधील टेलिफोन एक्स्चेंज या ठिकाणी झाडे पडली. अग्निशमन विभागाने तत्काळ ही झाडे हटवून वाहतूक मोकळी केली; तसेच गंजपेठ एरंडवणा, हर्डिकर हॉस्पिटल; तसेच कोरेगाव पार्कमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्याची माहितीही अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

कशामुळे आला हा पाऊस?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता आता कमी झाली असली तरी हवेतील चक्रीय स्थितीमुळे दक्षिण छत्तीसगड व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी मॉन्सून मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रातून तसेच बंगालच्या उपसागरावरूनही आर्द्रता मोठ्या प्रमाणावर भूभागावर येत आहे. त्या जोडीला सकाळी वातावरणात असलेली उष्णता यामुळे स्थानिक परिस्थितीत मोठ्या ढगांची निर्मिती होत आहे. यातूनच जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली.

आजही जोरदार पाऊस

पुण्यासह कोकणात अनेक ठिकाणी बुधवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बदलानंतर पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार पाऊस पडला आहे, अशी माहिती सानप यांनी यावेळी दिली. पुण्यात गुरुवारी देखील अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शुक्रवारनंतर पाऊस कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

धरणांमधूनही विसर्ग सुरू

गेल्या चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण ९० टक्के भरले आहे. तर वरसगाव, पानशेत, तसेच टेमघर धरण यापूर्वीच शंभर टक्के भरले आहे. पावसामुळे असल्याने पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, बुधवारी संध्याकाळी पाच वाजता खडकवासला धरणातून सुरुवातीला २ हजार ५६८ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री सात वाजता हा विसर्ग ६ हजार ७४३ करण्यात आला. पाण्याचा येवा वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले.

यापूर्वीचा पाऊस

पुण्यात बुधवारी सुमारे दोन तासांत शिवाजीनगर भागात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वी २०२० मध्ये शिवाजीनगरलाच ऑक्टोबरमध्ये एका दिवसात ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यापूर्वी २०११ मध्येही १०५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला होता. तर मध्यवर्ती भागात २०१० मध्ये ऑक्टोबरमधील आजवरचा सर्वांत मोठा पाऊस १८१ मिलिमीटर इतका झाला होता.

शहरात तसेच जिल्ह्यात साडेपाचपर्यंत झालेला पाऊस

चिंचवड १२७.५
शिवाजीनगर १२४

वडगावशेरी ७१.५
कोरेगाव पार्क ६३

नारायणगाव ५५
एनडीए ४२

खेड ४१
हडपसर ३८

भोर ३०
लोणावळा २६

राजगुरूनगर २२
बारामती २१

पाषाण १९.८
लोणी काळभोर १२.५

दौंड १२
माळीण ११.५

मगरपट्टा १०
दापोडी ८.५

तळेगाव १.५
लवळे १.५

सासवड १
इंदापूर ०.५

Web Title: Pune Rain: Record break in 2 hours in Pune; Due to the torrential rains, the roads are flooded and life is disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.