Breaking: पुण्यात रात्रभर पाऊस कोसळतोय; आज संपूर्ण शहर, या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 06:21 AM2024-07-25T06:21:13+5:302024-07-25T06:21:41+5:30
Pune Rain Red Alert: मागील वेळी घाटक्षेत्रातील अतिमुसळधार पावसाचा इशारा शहराला देण्यात आल्याने शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतू, तेव्हा पुण्यात उन पडले होते.
मागील वेळी घाटक्षेत्रातील अतिमुसळधार पावसाचा इशारा शहराला देण्यात आल्याने शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतू, तेव्हा पुण्यात उन पडले होते. हवामान विभागाने दुपारी तो इशारा घाटमाथ्यासाठी होता असे स्पष्ट केले होते. परंतू आज रात्रभर पुण्यात पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून पुण्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसाने रात्रीपासून जोर धरला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. शहरातही धोधो सुरु आहे. यामुळे पुणे शहरासह भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवून पहाटे ०५•३० वाजता ३५ हजार ५७४ क्यूसेक करण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
- कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग