Pune Rain: कधी कडक ऊन, तर कधी पाऊस; सरींसोबत होणार गणरायांचे दर्शन
By श्रीकिशन काळे | Published: September 8, 2024 07:42 PM2024-09-08T19:42:03+5:302024-09-08T19:42:20+5:30
गणेशोत्सवात पावसाच्या सरीसोबतच गणरायाचे दर्शन घ्यावे लागणार असले तरी दुपारी मात्र चांगलेच उकडणार
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. कधी कडक ऊन, तर कधी पाऊस असा लपंडाव पुणेकरांना अनुभवायला मिळत आहे. पुढील तीन दिवसदेखील असेच राहतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागत आहे. मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सर्वत्र होत आहे. घाट माथ्यावर मात्र पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरामध्ये मात्र सोमवार (दि.९) ते गुरुवार (दि.१२) हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात पावसाच्या सरीसोबतच गणरायाचे दर्शन घ्यावे लागणार आहेे. दुपारी मात्र चांगलेच उकडणार आहे. रविवारीदेखील आकाश निरभ्र होते आणि अचानक पावसाची हजेरी लागली. त्यामुळे दिलासा मिळाला, पण उकाडा मात्र जाणवत आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील लोणावळा, माळीण या भागात पाऊस होत आहे, तर खेड, नारायणगाव, तळेगाव, दापोडी, लवळे येथेही पावसाच्या सरी कोसळत आहेत.
गेल्या २४ तासांतील पाऊस
भोर : ४३.५ मिमी
शिवाजीनगर : ०.४ मिमी
माळीण : १४.५ मिमी
लोणावळा : १०.५ मिमी
नारायणगाव : ४ मिमी
खेड : १.५ मिमी
चिंचवड : १ मिमी
तळेगाव : ०.५ मिमी
लवळे : ०.५ मिमी