Pune Rain: पुण्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू; जून महिना कोरडा, जुलैमध्ये मुसळधारांची अपेक्षा
By श्रीकिशन काळे | Published: July 8, 2023 05:39 PM2023-07-08T17:39:13+5:302023-07-08T17:42:09+5:30
आज दुपारी ऊन असताना सायंकाळी ५ वाजता आकाशात ढग जमा झाले आणि पावसाने हजेरी लावली...
- श्रीकिशन काळे
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. केवळ रिमझिम पाऊस येत आहे. दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येत आहेत. आज दुपारी ऊन असताना सायंकाळी ५ वाजता आकाशात ढग जमा झाले आणि पावसाने हजेरी लावली.
यंदा माॅन्सून उशीरा दाखल झाला आहे. जून महिना तर कोरडाच गेला आहे. आता जुलै महिना सुरू झाला असला तरी जोरदार पावसाची पुणेकरांना प्रतीक्षा आहे. मोठा पाऊस झाला की, भिडे पूल पाण्याखाली जातो आणि तेव्हाच पुणेकरांना चांगला पाऊस झाल्याचा फिल येतो. भिडे पूल कधी पाण्याखाली जाणार, अशीच चर्चा सध्या पुणेकरांमध्ये सुरू आहे.
गेल्या काही वर्षांत २०१४ आणि २०२२ या दोन वर्षी संपूर्ण जून महिन्यात ५० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मॉन्सूनने राज्यात ११ जून रोजी तळ कोकणासह दक्षिणेकडील काही भागांत प्रवेश केला. मात्र त्यानंतर मॉन्सूनचा प्रवास अडखळत सुरू आहे. यंदा जून महिन्यात पुण्यात केवळ १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे दिलासा मिळाला. जुलैमध्ये मात्र अद्याप केवळ हलक्या सरींनी पुणेकरांना भिजवले आहे. 'ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा' अशा प्रकारची भावना पुणेकरांच्या मनात आल्यावाचून राहणार नाही.
येत्या दोन तीन दिवसांत पुण्यात आकाश ढगाळ राहील आणि हलक्या सरी येतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या आठवड्यात तरी जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत नाही.