Pune Rain| जोरदार पावसाने भाविकांच्या उत्साहावर फिरले पाणी; पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
By नितीन चौधरी | Published: September 7, 2022 08:49 PM2022-09-07T20:49:11+5:302022-09-07T20:50:00+5:30
पाणी साचल्याने वाहतूक कोंडी....
पुणे : सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. दुपारी अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. दुपारनंतर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा चांगलाच हिरमोड झाला. मात्र ,पाऊस थांबल्यावर रस्त्यांवरील पाणी ओसरल्यावर भाविकांच्या गर्दीचा पूर आला होता. मात्र, रात्री पुन्हा पाऊस सुरू झाल्याने उत्सवावर तसेच भाविकांच्या उत्साहावर पावसाचे पाणी फिरले.
पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
शहरात मंगळवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. बुधवारी सकाळी वातावरण मोकळे होते. मात्र, दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण झाले व जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या पश्चिम व दक्षिण भागात पावसाचा जोर जास्त होता. सुरुवातीला अधूनमधून सरी येत असल्याने अनेक नागरिक रेनकोट न घालता बाहेर पडले होते. पाऊस सुरू झाल्यावर अनेकांना आडोसा घ्यावा लागला. दुपारी तीननंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहराच्या मध्य भाग, कोथरूड, सातारा रस्ता, सेव्हन लव्हज चौक, अप्पर इंदिरा नगर, हडपसर, लोहगाव परिसरात पावसाचा जोर वाढला.
असा झाला पाऊस
शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत झालेला पाऊस मिमीमध्येः शिवाजीनगर ३३.६, पाषाण १८.८, लोहगाव २१.२, मगरपट्टा ३३. तर आशय मेझरमेंटने केलेल्या नोंदीनुसार कात्रज येथे ४.६, खडकवासला १.६, वारजे ४.२ मिमी पाऊस झाला.
दोन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शहरात गुरुवारी व शुक्रवारी मेघगर्जनेसह व विजांच्या क़डकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अधूनमधून जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी गणेश विसर्जन असल्याने नदीत जाताना भाविकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.