Pune Rain: पुण्यात धो धो नाही, पण चांगल्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: July 5, 2024 06:41 PM2024-07-05T18:41:06+5:302024-07-05T18:41:27+5:30
देशाच्या मध्यावर असलेल्या मॉन्सूनची आस त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत धो धो पाऊस पडणार नाही
पुणे: गेल्या महिन्यात पावसाला जोर नव्हता. पण आता मॉन्सूनमध्ये बळकटी येत असून, चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या ९ जुलैपर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात धो धो नाही, पण चांगलाच पाऊस कोसळेल, असे वातावरण तयार होत असल्याची माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
पुणे शहर व जिल्ह्यात जून महिन्यात खूप पाऊस झालेला नाही. काही भागात झाला, पण ज्या भागात होणे अपेक्षित होते, तिथे अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. केवळ बारामती, दौंड, इंदापूर या परिसरामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात मात्र शनिवारपासून (दि.६) चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.
सध्या मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे २ किंवा ४-५ मिमी पावसाची नोंद होत आहे. काही भागात अधिक पाऊस झालाय. तसेच राज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या मॉन्सून बळकट होत असल्याने तिथेही पावसाचा जोर वाढेल. तसेच पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला.
देशाच्या मध्यावर असलेल्या मॉन्सूनची आस त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत धो धो पाऊस पडणार नाही आणि धरणे भरणार नाहीत. पण जुलै महिन्यात चांगला पाऊस होऊन, धरणे भरण्याची शक्यता आहे, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.