पुण्यात दरवेळी पाऊस पडला की वाहतूक कोंडी का होते? काल घरी जायला चार तास लागले...
By हेमंत बावकर | Published: September 26, 2024 04:18 PM2024-09-26T16:18:19+5:302024-09-26T16:18:53+5:30
Pune Rain Traffic Jam: बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात पुण्यात सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती. विद्यापीठ चौकात तर चार-पाच किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा पावसातच पुण्यात वाहतूक कोंडी का होते?
- हेमंत बावकर
पुण्यात गेले दोन-तीन दिवस तुफान पाऊस कोसळत आहे. आज तर पंतप्रधान मोदींनी पावसाच्या शक्यतेने पुणे दौरा रद्द केला आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात पुण्यात सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती. विद्यापीठ चौकात तर चार-पाच किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा पावसातच पुण्यात वाहतूक कोंडी का होते? याचे कारण म्हणजे सतत पाऊस पडायला लागला की लोक टूव्हीलर पार्किंगमध्येच ठेवून फोर व्हिलर बाहेर काढतात, हे आहे.
पुण्यात आता कोणताच रस्ता चांगला राहिलेला नाही, हे दुसरे कारण आहेच. सर्व रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यामुळे यातून वाहन चालविताना त्याची गती संथच होत आहे. त्यात पाणी साचलेले असेल तर खड्ड्यात आदळावे लागते ते वेगळेच. यामुळे वाहनांची गती कमी झाली आहे.
आज पुण्यात दर व्यक्तीमागे गाड्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. कोरोनापूर्वी सोसायट्यांच्या आवारातील पार्किंग गाड्यांसाठी पुरत होते, आता रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केलेली आढळतात. आज प्रत्येक घरात एका व्यक्तीमागे एक टूव्हीलर, एक-दोन फोर व्हीलर असे गुणोत्तर बनत चालले आहे. या त्याच फोरव्हीलर आहेत, ज्या पावसात भिजायला होते म्हणून बाहेर काढल्या जातात आणि मग तासंतास वाहतूक कोंडीत अडकून राहतात. ही परिस्थिती पुण्यातच नाही तर पिंपरी चिंचवडमध्येही आहे.
काल पुण्यात अर्ध्या तासाच्या रोजच्या प्रवासासाठी टूव्हीलरला दोन-अडीज तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. फोर व्हीलरवाले तर चार-पाच तास अडकलेले होते. एसबी रोड, ल़ॉ कॉलेज रोड, विद्यापीठ रोड, शिवाजीनगर आदी भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कालच्या प्रवासात एक मोठा बदल जाणवला तो म्हणजे टूव्हीलरची संख्या कमालीची कमी झाली होती व फोर व्हिलरची वाढली होती.
या वाढलेल्या फोर व्हिलरमुळेच पुण्यात पावसात प्रचंड वाहतूक कोंडी होते. औंध रोड आता पुण्यातील आयटी पार्कना जाण्यासाठी खुश्कीचा रस्ता झाला आहे. या रस्त्यावर तर वाहने ढिम्म हलत नव्हती. विद्यापीठ चौकात तेच होते. यामुळे पावसात भिजण्यापासून वाचायचे आणि वाहतूक कोंडीत तासंतास अडकायचे अशी परिस्थिती पुणेकरांवर आलेली आहे.
मग का काढायची फोर व्हीलर...
आयटी पार्कमुळे पुण्यात तरुण पिढी, मध्यम पिढीकडे प्रचंड पैसा आलेला आहे. हे लोक दररोज कार घेऊन बाहेर पडतात. कंपन्या या लोकांना कारसाठी मोबदलाही देतात. यामुळे आज एका कारमध्ये एकच व्यक्ती बसलेला दिसतो. लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे बहुतांश लोकांच्या मिटिंगाही कार चालविताना सुरु असतात. कारच्या म्युझिक सिस्टीमवरून मोबाईलवर बोलणे सुरु असते. इनोव्हा सारख्या मोठमोठ्या कारमध्ये एक व्यक्ती बसलेला असतो अशी परिस्थिती आहे. हे लोक ऑफिसला पोहोचतात कधी आणि आठ-नऊ तासांची शिफ्ट करून निघतात कधी असाही अनेकदा ही कोंडी पाहून प्रश्न पडलेला असतो.
या लोकांचेही काय चुकतेय म्हणा...
पुण्यात गेली अनेक वर्षे मेट्रोची कामे सुरु आहेत. उड्डाणपुलाची कामे सुरु आहेत. बांधलेला उड्डाणपूल तोडून तो पुन्हा बांधला जात आहे. यामध्येही वाहतूक कोंडी होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावालाच आहे. पुण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायचे असल्यास दोन-तीन बस बदलाव्या लागतात. यात वेळ जातो. शिवाय बसायला जागा मिळेलच याची शाश्वती नाही. मग ज्यांच्याकडे कार आहे, ऐपत आहे ते लोक एकटा का असेना कार घेऊन गारेगार एसीलावून बाहेर पडतात. मूळ पुणेकर काय की आता झालेले पुणेकर काय, कुठेतरी या गोष्टींचा विचार होण्याची गरज आज निर्माण झाली आहे.