Pune Rain: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट; ४१ बाधित पूर येण्याची शक्यता, महापालिका सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:53 PM2024-08-26T12:53:57+5:302024-08-26T12:54:21+5:30
एकता नगर, ,पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी मधील भाग, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल इत्यादी परिसरात सर्व यंत्रणा सज्ज
पुणे: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे. त्यामुळे पालिकेने ४१ बाधित ठिकाणी जिथे पूर येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांच्या जवळील शाळा, हॉल नागरिकांना सोयीसाठी तयार करण्यात आले आहेत, त्या नागरिकांकरिता जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्याकरिता पथके तयार करण्यात आलेली आहेत. तसेच आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छची टीम तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम तयार करण्यात आलेली आहे.
शहरात सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.यांच्या आदेशान्वये उपआयुक्त, खातेप्रमुख, पालिका सहायक आयुक्त, १५ क्षेत्रीय कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशामक दल हे कार्यरत होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे कायम संपर्कात होते. त्यानंतर खडकवासला धरणामधून दोन हजार क्युसेक पाणी सोडणार आहे अशी पूर्वसूचना मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा तयार करण्यात आली.
पुणे शहरांमधील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तो विसर्ग रात्री ३५ हजार क्युसेकपर्यंत करण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे बाधित होणारी ठिकाणे व नदीपात्रामधील जो भाग आहे त्या ठिकाणी गाड्या पार्क करू नये, जनावरे बांधण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
एकता नगर, ,पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी मधील भाग, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल इत्यादी परिसरामधील सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. ११ हजार ते १५ हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर शिवणे पूल बंद करण्यात आला. १५ हजार ते १८ हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर भिडे पूल बंद करण्यात आला. ३२ हजार क्युसेकच्या पुढे पाण्याचा विसर्ग केल्यास टिळक पूल बंद करण्यात आला. एनडीआरएफ, लष्कर आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याबरोबर कायम समन्वय साधण्यात येत आहे. मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक ०२०-२५५०१२६९, ०२०- २५५०६८०० या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.