पुण्यात राज ठाकरेंनी दिली मुठेच्या विकासाची ब्लू प्रिंट, मुख्यमंत्र्यांनाही सादर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:12 AM2017-08-23T01:12:30+5:302017-08-23T01:13:59+5:30
जायका कंपनीच्या नदी सुधार प्रकल्पाचे केवळ नावच गाजत असताना महापालिकेला आता प्रत्यक्ष या विकासाची ब्लू प्रिंटच मिळाली आहे.
पुणे : जायका कंपनीच्या नदी सुधार प्रकल्पाचे केवळ नावच गाजत असताना महापालिकेला आता प्रत्यक्ष या विकासाची ब्लू प्रिंटच मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत महापौर मुक्ता टिळक व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना ही मुठेच्या विकासाची ही ब्लू प्रिंट सादर केली. महापालिकेचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
घोले रस्त्यावरील महापालिकेच्या जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. म्हात्रे पूल ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंतच्या नदीपात्रालगतच्या विकासाचा आराखडा सादर केला. नाशिकच्या गोदापात्राचा आपण असाच विकास केला आहे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआरमधून निधी उभा करता येईल. नदीपात्रात फुलराणी, आखीवरेखीव संभाजी बाग, नदीपात्रात सोडले जाणारे मैलपाणी रोखणे अशा विविध योजना त्यात सुचवण्यात आल्या आहेत.
चित्रपटांप्रमाणे नाटकांसाठीही मल्टिप्लेक्स उभे करण्याचा विचार ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात प्रत्येकी हजार क्षमतेची पाच नाट्यगृहे, ५ हजार आसनक्षमतेचा खुला रंगमंच, १०० ते २०० आसनक्षमतेचे प्रायोगिक रंगकर्मींसाठी थिएटर अशा अद्ययावत सुविधा असतील.
हा आराखडा मुख्यमंत्र्यांनाही सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.