देशात राहण्यासाठी उत्तम शहरांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:23+5:302021-03-05T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय गृह आणि नगर विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात देशातील १११ शहरांमध्ये, राहण्यासाठी उत्तम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय गृह आणि नगर विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात देशातील १११ शहरांमध्ये, राहण्यासाठी उत्तम असलेल्या शहरांच्या श्रेणीत पुणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे़ तर बंगळुरू शहर हे प्रथम क्रमांकावर असून, पिंपरी-चिंचवड शहर १६ व्या क्रमांकावर आहे़ दरम्यान, महापालिका श्रेणीमध्ये पुणे शहराला पिंपरी-चिंचवडने मागे टाकले असून, पिंपरी-चिंचवड शहराचा चौथा, तर पुणे शहराचा पाचवा क्रमांक लागला आहे़
सन २०२० मधील सर्वेक्षणात केंद्रीय गृह व नगर विकास मंत्रालयाने १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील १११ शहरांचा सर्व्हे केला़ यात पहिल्या वर्षी म्हणजे सन २०१८ मध्ये प्रथम क्रमांकावर असलेले पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे़ राहण्यासाठी उत्तम शहरांमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये अनुक्रमे बंगळुरू (गुण ६६़ ७०), पुणे (६६़ २७), अहमदाबाद (६४़ ८७), चेन्नई (६२़ ६१), सूरत (६१़ ७३), नवी मुंबई (६१़ ६०), कोईम्बतूर (५९़ ७२), वडोदरा (५९़ २४), इंदोर (५८़ ५८), ग्रेटर मुंबई (५८़ २३) यांचा समावेश आहे़
याचबरोबर महापालिका श्रेणीमध्ये इंदोर (६६़ ०८) प्रथम क्रमांकावर आहे़ त्यापाठोपाठ सुरत (६०़ ८२), भोपाळ (५९़ ०४), पिंपरी-चिंचवड (५९़ ००), पुणे (५८़ ७९), अहमदाबाद (५७़ ६०), रायपूर (५४़ ९८), ग्रेटर मुंबई (५४़ ३६), विशाखापट्टम (५२़ ७७), वडोदरा (५२़ ६८) यांचा समावेश आहे़
-----------------
थेट संवाद, ऑनलाइन मते घेतली जाणून
सर्वेक्षणात राहणीमानास योग्य शहरांमध्ये जीवनशैली, आर्थिक सुबत्ता, नागरिकांचा दृष्टिकोन व स्थिरता यांची पाहणी करण्यात आली, यात प्रामुख्याने शैक्षणिक सुविधा, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार, वाहतूक व्यवस्था आदींची पाहणी करण्यात आली़ यात नागरिकांशी थेट संवाद साधून, ऑनलाईन मत नोंदीतून हे सर्वेक्षण पार पडले़
-------------------------------