घरविक्रीच्या क्रमवारीत पुणे तिसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:46+5:302021-08-21T04:15:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या परिस्थितीतून सावरत असलेल्या बांधकाम क्षेत्रातील सकारात्मक चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. यंदा पहिल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या परिस्थितीतून सावरत असलेल्या बांधकाम क्षेत्रातील सकारात्मक चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. यंदा पहिल्या सहामाहीत सुरू झालेल्या गृह प्रकल्पांची टक्केवारी २६.३ ने वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात विक्री कमी झाली होती. सहा महिन्यांतील चित्र बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा देणारे असल्याचे एका पाहणी अहवालात नमूद केले आहे.
जानेवारी-जून २०२१ दरम्यान शहरात एकूण १२ हजार ५५८ सदनिका असलेले गृहप्रकल्प सुरू झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा ९ हजार ९४४ होता. दोन्ही वर्षांची तुलना करताना आकडा २६.३ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात नमूद केले आहे. जानेवारी ते जून २०२० दरम्यान पुण्यात २० हजार ४३१ सदनिकांची विक्री झाली. मात्र, यंदा हा आकडा १६ हजार २२० पर्यंत खाली आला आहे. विक्री २०.६ टक्क्यांनी कमी झाली आहे. विक्री कमी झाली असली तरी नवीन प्रकल्प सुरू होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) गेल्या वर्षी १ हजार २५१ सदनिका असलेले प्रकल्प सुरू केले होते. त्यात यंदा सव्वाशे टक्क्यांनी वाढ होत ही संख्या २ हजार ८१० युनिट्सवर पोचली. रिअल इनसाइट (रेसिडेन्शिअल)च्या अहवालात हा तपशील नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षभराचा विचार केला असता. २०२१ च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत पुण्यात निवासी प्रकल्प सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराची एकूण विक्री २,४९५ युनिट्स होती, जी यंदा ४९ टक्क्यांनी घटली होती. “कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्याने घरांची मागणी वाढली आहे. बाजार अहवाल आणि विश्लेषण सूचित करतात की, येणारे महिने बांधकाम क्षेत्रासाठी चांगले ठरतील,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी मणी रंगराजन यांनी सांगितले.