Pune Crime: महिलांसाठी पुणे असुरक्षितच; अल्पवयीन मुलींना अधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 01:50 PM2023-12-16T13:50:19+5:302023-12-16T13:50:45+5:30

शहरात दररोज बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या तीन ते चार घटना घडत आहेत....

Pune remains unsafe for women; Adolescent girls are more at risk | Pune Crime: महिलांसाठी पुणे असुरक्षितच; अल्पवयीन मुलींना अधिक धोका

Pune Crime: महिलांसाठी पुणे असुरक्षितच; अल्पवयीन मुलींना अधिक धोका

पुणे : देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. तर राज्यात गुन्ह्यांच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर असून, पुण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचेदेखील या अहवालात म्हटले आहे. शहरात दररोज बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या तीन ते चार घटना घडत आहेत.

२०२२ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे चार लाख ४५ हजार ७७ गुन्हे दाखल झाले. पैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये दाखल असून, त्याखालोखाल राजस्थानचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे मोठ्या शहरांमध्ये घडत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे. यात अनुक्रमे मुंबई, ठाणे, अहमदनगर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

महिलांचा छळ महाराष्ट्रात सर्वाधिक

महिलांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. २०२२ मध्ये राज्यात ९२७ गुन्हे दाखल झाले आहेत. कौटुंबिक छळामुळे महिला आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाइकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किती छळ वाढला?

- २०२१ मध्ये देशात तब्बल ४ लाख २८ हजार २७८ महिलांचा छळ अथवा अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण १५.३ टक्क्यांनी अधिक आहे.

- २०२० मध्ये या प्रकरणांमध्ये ३ लाख ७१ हजार ५०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सर्वाधिक गुन्हे (३१%) हे पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ केल्याचे आहेत.

शरीरावर ओरखडे

- देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणांत नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात.

- देशात बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात.

- यातही १८ ते ३० वर्षांच्या महिलांवर ओरखडे ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पतीकडून नेमका कधी छळ होतो?

- लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस अगदी मजेत जातात. सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर लगेच छळ करण्यास सुरुवात होते. लग्न झाल्यानंतर २ ते ४ वर्षांच्या काळात हे प्रमाण अधिक वाढते, तर १० वर्षांहून अधिक काळ छळ झालेल्या महिलांचे प्रमाण देशात २६ टक्क्यांहून अधिक आहे.

Web Title: Pune remains unsafe for women; Adolescent girls are more at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.