पुणेकरांना जलधारांनी दिलासा; सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर पावसाला सुरुवात
By श्रीकिशन काळे | Published: May 18, 2024 05:16 PM2024-05-18T17:16:50+5:302024-05-18T17:17:32+5:30
शहरात अनेक ठिकाणी पाऊस होत असून काही ठिकाणी वादळी वारे सुटले
पुणे : सकाळपासून प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या पुणेकरांना सायंकाळी जलधारांनी दिलासा दिला. दुपारी दमट वातावरणामुळे अंगातून घाम निघत होता, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ढगांची गर्दी झाली आणि पावसाने हजेरी लावली.
गेल्या तीन चार दिवसांपासून माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यासह पुण्यात देखील पावसाची हजेरी लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस होत असून गुरूवार पेठेत एका ठिकाणी झाड देखील पडले आहे. हलक्या ते मध्यम सरी कोसळत असून, पुणेकरांची चांगलीच धांदल उडत आहे.
माॅन्सूनचे आगमन उद्या रविवारी अंदमानात होत आहे. तर केरळमध्ये ३१ मे रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यामध्येही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या चार दिवसांमध्ये वादळी वारा आणि विजांचा कडकडाट होईल, असा इशाला देण्यात आला आहे.