एकीकडे पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा अन् जिल्ह्यातील कळमोडी धरण ओव्हर फ्लो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:04 PM2023-07-18T16:04:51+5:302023-07-18T16:04:59+5:30
यंदाच्या पावसाळयात एका महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरलेले पुणे जिल्ह्यातील पहिले धरण
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पुर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग आरळा नदी पात्रात होऊ लागला आहे. या वर्षी पुणे जिल्ह्यातील १०० टक्के भरलेले हे पहिलेच धरण ठरले आहे. या धरणातून सांडव्यावाटे येणारे पाणी चासकमान धरणात येत असल्याने चास कमान धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसह आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठाराला हे धरण वरदान ठरलेले आहे. धरण सोमवारी रात्री उशिरा पुर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. या धरणात सन २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा भरत आहे. धरण भरल्यावर पाणी बाहेर पडायला दरवाजे नसल्याने थेट सांडवा वाहु लागतो. कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर गेली आठ दिवसांपासून वाढला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाव व परिसरात पावसाचा जोर चांगला राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होवून धरण शंभर टक्के भरले आहे. आरळा नदीपात्रात रात्रीच्या सुमारास पुर वाहु लागला. धरणात ४२.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वेगाने होणार असल्याने नदिकाठच्या गावांना धरण प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मागील वर्षी धरण ११ जुलै पूर्ण क्षमतेने भरले होते.धरण परिसरात एक जुनपासून ४२८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली असून धरण पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी समाधान व्यक्त करित आहे.