पुणेकरांनो सावधान ! जून-जुलै महिन्यात पुन्हा येऊ शकते कोरोनाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 08:54 PM2021-02-15T20:54:04+5:302021-02-15T20:54:37+5:30
हर्ड इम्युनिटी ही फसवी आहे. जो आजार आपल्याला माहित नाही त्याबद्दल सावध पवित्रा घ्यावा. महापालिकेने टेस्टींग वाढवावे. कोरोना हा आपल्या सोबत राहणार आहे हे लक्षात घेऊनच वागण्याची गरज आहे
पुणे - शहरात आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला लागली आहे. लोकांनी नियम न पाळल्यामुळेच रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॅा. धनंजय केळकर यांनी म्हटलंय. केळकर यांनी लोकमतशी खास संवाद साधताना कोरोना वाढीची नेमकी कारणं काय हे सांगितलं. परदेशात निर्बंध उठवले, थंडी वाढली आणि पुन्हा कोरोना आला. त्यामुळे पुन्हा एकदा लॅाकडाउन करण्याची वेळ आली. आपल्याकडेही हा आलेख हळू हळू वाढत आहे. जुन-जुलै महिन्यात पुन्हा कोरोनाची लाट येऊ शकते. त्यामुळे, सतर्कता बाळगण्याची गरज आहे, असेही केळकर यांनी सांगितले.
पुण्यामध्ये १४० पासून वाढून रविवारी तीनशेच्यावर हा आकडा पोहोचला आहे, ही सेकंड वेव्ह नाही. पण, ही आपल्यासाठी वॉर्निंग आहे, म्हणजे कोरोना अजूनही गेलेला नाही. पण, जणू काही कोरोना नाहीसा झालाय असाच उत्साह सर्वत्र दिसून येतोय. सार्वजनिक ठिकाणी गर्दी सुरु झालीय. त्यामध्ये पुणेकर थांबणार का नाही हा प्रश्न निर्माण होतो आहे. पण, जोपर्यंत वॅक्सिन नाही, तोपर्यंत सतर्क रहाणे आवश्यक आहे. लोकांनी सतर्कता पाळली तर एवढ्यात लॅाकडाउन पाळण्याची आवश्यकता पडणार नाही, असे मत डॉ. केळकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
हर्ड इम्युनिटी ही फसवी आहे. जो आजार आपल्याला माहित नाही त्याबद्दल सावध पवित्रा घ्यावा. महापालिकेने टेस्टींग वाढवावे. कोरोना हा आपल्या सोबत राहणार आहे हे लक्षात घेऊनच वागण्याची गरज आहे. सध्या पुण्यात फक्त दोनच दवाखान्यात कोरोनाचे उपचार केल्याचा दावा करत डॉक्टर केळकर म्हणाले प्रत्येक रुग्णालयामध्ये कोरोनाचे पेशंटवर उपचार करणे आवश्यक आहे. तसेच, जर कुणालाही काही लक्षणे दिसली तर तातडीने डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता असून त्यांच्या सल्ल्यानेच विलगीकरणात रहावे, असेही त्यांनी सांगितलं.