पुणेकरांवर घोंगावतेय पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 09:03 AM2023-04-25T09:03:50+5:302023-04-25T09:04:29+5:30
पुणे महापालिकेनेही खडकवासला धरण साखळीतील उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेऊन नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे...
पुणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने राज्य शासनाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे महापालिकेनेही खडकवासला धरण साखळीतील उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेऊन नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
लवकरच शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या हालचाली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाल्या आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवारी दि. २६ होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीनंतरच पाणी कपातीचा निर्णय होणार आहे
खडकवासला धरण साखळीमध्ये आजमितीला ११.७६ टीएमसी पाणीसाठा आहे. शहराला दररोज १४७० एमएलडी पाणी लागते. दरवर्षी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करून उपलब्ध धरणसाठ्यातून पुणे महापालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. परंतु यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाला विलंब होण्याचा तसेच पावसाचे प्रमाण कमी राहाण्याचा अंदाज राष्ट्रीय वेधशाळेने व अन्य हवामान अभ्यासक संस्थांनी वर्तविल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्याची तयारी केली आहे. या कालावधीत दोन बाष्पीभवन व गळतीतून २ टीएमसी पाणी खर्ची होईल व धरणांतून पुढील गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी सुमारे साडेतीन टीएमसी पाण्याची गरज भासेल. उर्वरित अर्थात ६.२५ टीएमसी पाणी ३१ ऑगस्टपर्यंत वापरायचे झाल्यास महापालिकेला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवावे लागणार आहे.
महापालिका स्तरावर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनादेखील पाणी वापराबाबत आवाहन करण्यात येत आहे. येत्या २६ एप्रिल रोजी कालवा समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुणे महापालिकेला उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्याची माहिती घेतल्यानंतरच पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे.