Mahavitaran Strike: पुणेकरांना महावितरणच्या संपाचा जबरदस्त फटका; तीस हजार नागरिक अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 07:53 PM2023-01-04T19:53:18+5:302023-01-04T19:53:28+5:30

पाणीपुरवठा योजना, मोठी रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींसह वीजपुरवठा सुरळीत राहिला

Pune residents hit hard by strike of Mahavitran; Thirty thousand citizens in the dark | Mahavitaran Strike: पुणेकरांना महावितरणच्या संपाचा जबरदस्त फटका; तीस हजार नागरिक अंधारात

Mahavitaran Strike: पुणेकरांना महावितरणच्या संपाचा जबरदस्त फटका; तीस हजार नागरिक अंधारात

Next

पुणे : खासगीकरणाविरोधात महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे शहराच्या अनेक भागांत वीज खंडित झाली. सिंहगड परिसरात तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे सुमारे ३० हजार नागरिकांना विजेअभावी दिवस काढावा लागला. त्यामुळेच हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे झोनल मॉनिटर विश्वास भोसले यांनी सांगितले. मात्र, पाणीपुरवठा योजना, मोठी रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींसह वीजपुरवठा सुरळीत राहिला.

या संपामुळे शहरातील सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी, शिवणेमधील उत्तमनगर, वाकड व सांगवीमधील काही परिसर, सुस रोड, म्हाळुंगे, पाषाण, धनकवडी, आंबेगाव, कात्रज, गोकूळनगर, भिलारेवाडी, रामटेकडी, हडपसर गाडीतळ, बीटी कवडे रोड, टिंगरेनगर, मोहननगर, प्रेस कॉलनी, कोथरूडमधील शास्त्रीनगर आदी परिसरात विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. सिंहगड रोड या परिसरात पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने अभिरूची, लिमयेनगर, प्रयागा हे तीन उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी त्यामुळे सुमारे ३० हजार वीजग्राहकांची मोठी गैरसोय झाली. त्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला मात्र, संप संपल्यानंतरच हा पुरवठा सुरळीत झाला. संपावरील अभियंते व कर्मचाऱ्यांअभावीच हा पुरवठा सुरळीत झाला नाही असा दावा भोसले यांनी केला. त्यामुळे संप १०० टक्के यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

या संपात दिवसभराच्या पाळीमध्ये पुणे परिमंडलातील ९२ टक्के कर्मचारी, अभियंता व अधिकारी सहभागी झाले होते. तर दुसरीकडे मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे विविध कारणांनी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी रात्रभरापासून ‘ऑन फिल्ड’ होते. मुंबईतील वाटाघाटींनंतर हा संप मागे घेण्यात आल्यानंतर पुणे शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला. उर्वरित ३० टक्के भागांमध्ये दुरुस्ती कामांद्वारे रात्री ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

यासोबतच चाकण एमआयडीसीमधील पाच वीजवाहिन्या तसेच तळेगाव शहर, इंदोरी, वडगाव, सोमाटणे, नाणेकरवाडी, कुरळी, कडूस गावांना वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता. मात्र युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून सर्व वीजपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला. जुन्नर, ओतूर गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो देखील सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. भोसरी एमआयडीसी सेक्टर ७ तसेच कुदळवाडी, देहू गाव, बोऱ्हाडेवाडी, चिखली तसेच निगडीमधील ओटा स्कीम परिसरातील वीजपुरवठा विविध बिघाडांमुळे खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत या परिसरात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Web Title: Pune residents hit hard by strike of Mahavitran; Thirty thousand citizens in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.