पुणेकरांनी ५८ दिवसांत भरला ५८५ कोटींपेक्षा जास्त मिळकतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:25+5:302021-05-29T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाला साथ देत पुणेकरांनी देशात सर्वाधिक मिळकतकर जमा केला. त्यामुळे कोरोनाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाला साथ देत पुणेकरांनी देशात सर्वाधिक मिळकतकर जमा केला. त्यामुळे कोरोनाच्या काळातही पालिकेचा आर्थिक गाडा रुळावर राहिला. पुणेकरांची हीच साथ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कायम असून १ एप्रिल ते २८ मे या ५८ दिवसांमध्ये ४ लाख ४३ हजार ३९९ पुणेकरांनी ५८५ कोटी १४ लाख रुपयांचा मिळकतकर जमा केला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर जमा होण्यात दुपटीने वाढ झाल्याची माहिती महापालिकेचे कर आकारणी व कर संकलन विभागप्रमुख विलास कानडे यांनी दिली.
गेल्या वर्षी कोरोनाकाळात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या काळात संपूर्ण मिळकतकर भरलेल्या निवासी मिळकतधारकांना ३१ मे २०२१ पूर्वी संपूर्ण मिळकतकर जमा केल्यास सर्व करांवर (शासनाचे कर वगळून) १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात २८ मेपर्यंत ३ लाख ३६ हजार २९४ मिळकतधारकांनी १५ टक्के सवलतीला लाभ मिळवला आहे. या मिळकतधारकांनी २५३ कोटी ३४ लाख रुपयांचा कर जमा केला असून त्यांना ४२ कोटी ५ लाख रुपयांची सवलत मिळाली.
याव्यतिरिक्त ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना सर्वसाधारण करामध्ये १० टक्के सवलत दिली जाणार आहे. ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा पेक्षा जास्त आहे, त्यांना ५ टक्के सवलत देण्यात येत आहे. सवलत मिळण्याकरता ३१ मेपूर्वी मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक असल्याचे कानडे म्हणाले. ऑनलाईन कर भरणा करणाऱ्या पुणेकरांची संख्या यंदाही जास्त आहे.
चौकट
भरणा पद्धत। मिळकती। टक्केवारी। रक्कम (कोटी रुपये)
डिजिटल। ३,४२,६६८। ७७.२८%। ३९४.७७
रोख। ५४,२४६। १२.२३। ४१.०१
धनादेश। ४६,४८५। १०.४८। १४९.३५