पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्लाझ्मा दानासाठी ३५० नागरिक आले पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 08:31 PM2020-08-27T20:31:55+5:302020-08-27T20:35:23+5:30
प्लाझ्मा दान करु इच्छिणारे व प्लाझ्माची गरज असलेल्यांसाठी पुणे प्लाझ्मा अॅप सुरु
पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संशयितांचा शोध घेण्यात पुढाकार घेतलेल्या पुणेपोलिसांनी आता प्लाझ्मा दानासाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गेल्या १० दिवसात तब्बल ३४५ जणांनी पोलिसांकडे प्लाझ्मादानासाठी नाव नोंदणी केली आहे.
याबाबत पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी सांगितले की,पुणे पोलिसांनी प्लाझ्मा दानासाठी आवाहन केल्यानंतर गेल्या १० दिवसात असंख्य पुणेकरांनी याबाबत चौकशी केली आहे. आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या व २८ दिवस पूर्ण झालेल्या ३४५ जणांनी पोलिसांकडे नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी ४९ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. हे सर्व जण सर्वसामान्य पुणेकर आहेत. जशी मागणी येईल, त्यानुसार या नाव नोंदणी केलेल्यांकडून प्लाझ्मा दान करुन घेण्यात येणार आहे.
प्लाझ्मा दान करु इच्छिणारे व प्लाझ्माची गरज असलेल्यांसाठी पुणे प्लाझ्मा अॅप सुरु करण्यात आले आहे. पुणे प्लाझ्मा डॉट इन या अॅपवर संपर्क साधता येईल. प्लाझ्मा दाते आणि रुग्ण यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रिती शिंत्रे (९९६०५३०३२९) या काम पहात आहेत.
कोरोनामुक्त झालेले रुग्ण २८ दिवसांनंतर कोरोनाचे कोणतेही लक्ष दिसून येत नसलेल्या रुग्ण प्लाझ्मा देऊ शकतात. त्यामुळे शरीरातील कोणत्याही अवयवाला अपायकारक ठरत नाही.
कोरोना मुक्त रुग्णाने प्लाझ्मा दान करावा व अत्यावश्यक परिस्थितीत असणाºया रुग्णांना वाचवावे, असे आवाहन डॉ.के. व्यंकटेशम यांनी केले आहे.
़़़़़़़़
आमच्या संपूर्ण कुटुंबाला २९ जून रोजी कोरोना संसर्ग झाला होता. त्यातून आम्ही सर्व जण बरे झालो़ आता मी प्लाझ्मा दान केले आहे. पुणे पोलिसांनी प्लाझ्मा दान करणारे व गरज असणाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था केली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्यांनी आपला प्लाझ्मा दान करुन क्रिटिकल रुग्णांना वाचविण्याची गरज आहे.
अभिजित पाटणकर