पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:29 AM2021-08-09T10:29:24+5:302021-08-09T10:35:30+5:30
शिल्लक साठा शासन उधार घेणार ; जुना स्टॉक घेऊन देणार नव्या लस
पुणे : जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांकडे उपलब्ध असलेला लसींचा साठा जिल्हा प्रशासन घेणार आहे. या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रशासनाचा विचार असून त्या बदल्यात खासगी दवाखान्यांना नव्या लसींचा साठा पुरवण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. सध्य स्थितीत ४ लाख ६१ हजार कोरोना लसीचे डाेस खासगी दवाखान्यांकडे पडून आहेत.
लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी दवाखान्यांना उत्पादकांकडून थेट लस खरेदी करून शासनाने दिलेल्या भावात नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, खासगी दवाखान्यातील लसीकरणाला नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना लसींचे डोस या दवाखान्यांकडे पडून आहेत. या लसींची एक्सपायरीडेट या मुळे संपून हे डोस वाया जाण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांकडे ४ लाख ६१ हजार डोस शिल्लक आहे. हे डाेस या दवाखान्यांकडून जिल्हा प्रशासन उधार घेऊन ते नागरिकांना देणार आहेत. त्या बदल्यात काही दिवसांनी शासनाकडून मिळालेले नवे डोस खासगी दवाखान्यांना दिले जातील. यामुळे पडून असलेले डोस नागरिकांना देता येणार असून यामुळे त्यांची मदुत संपून ते वाया जाणार नाहीत. या सोबतच लस साठवताही येणार नाही. या माध्यनातून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा हेतू शासनाचा आहे.
खासगी दवाखान्यांना १ सप्टेंबरपासून त्यांच्या मागणीनुसार कोरोना लसींचा पुरवठा
खासगी दवाखान्यांना १ सप्टेंबरपासून त्यांच्या मागणीनुसार कोरोना लसींचा पुरवठा करण्यात येईल. या दवाखान्यांना प्रशासनाकडून लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. खासगी दवाखान्यांना शासनाला लस द्यायची असल्यास कोेरेगाव पार्क येथील लस साठवण केंद्राशी किंवा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खाजगी दवाखान्यांना केले आहे.