पुणेकरांची चिंता मिटली! खडकवासला प्रकल्पात एका दिवसात चार टीएमसी पाणी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 08:11 PM2021-07-22T20:11:47+5:302021-07-22T20:16:04+5:30
खडकवासला धरण (९६.१७ टक्के) एवढे झाले असून भरण्याच्या मागार्वर आहे. तर प्रकल्पात ५६.१८ टक्के साठा
पुणे : खडकवासलाधरण प्रकल्पात एका दिवसांत चार टीएमसी पाणी वाढले आहे. बुधवारी १२.२३ टीएमसी साठा होता. तो गेल्या २४ तासांत चार टीएमसीने वाढून १६.३८ टीएमसी साठा झाला असून प्रकल्पात एकूण ५६.१८ टक्के साठा झाला आहे. तर खडकवासलाधरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खडकवासलातून गुरूवारी दुपारी २ हजार ४०० क्युसेकने तर सायंकाळी ५ हजार क्युसेकने पाणी सांडव्यात सोडण्यास सुरूवात झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. ताम्हीणी परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल ४६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात पातळीत ७ फुटाने (३८.६० टक्के साठा) वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरण क्षेत्रात गुरूवारी सर्वात जास्त १९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल वरसगाव धरण क्षेत्रात १०१ मिलीमीटर तर पानसेत धरण क्षेत्रात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून खडकवासला परिसरात १५ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.
दोन धरणे शंभर टक्के तर बारा धरणांत ५० टक्क्यांच्या पुढे साठा
जिल्ह्यातील कळमोडी आणि कासारसाई ही दोन धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर खडकवासला धरण (९६.१७ टक्के) भरण्याच्या मार्गावर आहे. तसेच आंध्रा धरण ८६.३० टक्के, वडिवळे ७८.१५ टक्के, पानशेत ६०.६३ टक्के, भामा आसखेड ५५.८२ टक्के, वडज ५२.८२ टक्के, वरसगाव ५१.९४ टक्के, वीर ४९.८४ टक्के, निरा देवघर ४८.३६ टक्के, येडगाव ४७.६७ टक्के, डिंभे ४३.७३ टक्के भरले आहे.