Pune: पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 03:39 PM2022-01-06T15:39:11+5:302022-01-06T15:42:47+5:30
नागरिकांनी दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नये, आपणहून नियम पाळावेत.
पुणे : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना लागू असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्कचा वापर करावा; अन्यथा नियम न पाळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
डॉ. शिसवे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून नियमांचे पालन करण्यात कुचराई केली जाऊ लागली आहे. अनेक जण मास्कचा वापर न करता फिरताना दिसू लागले आहेत. शहरात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे आता पुन्हा नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी न चुकता मास्क वापरावा. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्यांना शिस्त लागावी म्हणून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नये, आपणहून नियम पाळावेत. मास्कबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतराचा नियम पाळणे गरजेचे आहे. पुणेकरांनी पहिल्या, दुसऱ्या लाटेत तसेच गणेशोत्सव काळात प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. यावेळीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.