पुणेकरांना आणखी एक 'दिलासा' मिळणार; दुचाकीस्वारांचीही लवकरच'मास्क'मधून सुटका होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 04:02 PM2021-01-28T16:02:11+5:302021-01-28T16:02:28+5:30
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या आठवड्यात खासगी मोटारीतून प्रवास करण्यांना मास्क न वापरण्याची सवलत दिली आहे.
पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर खासगी मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना महापालिकेने मास्कमधून सुटका केली आहे. त्याचबरोबर आता लवकरच दुचाकीस्वारांची मास्कमधून लवकरच सुटका होणार आहे.
मोटारीत जवळचेच लोक प्रामुख्याने असतात. अनेकदा ते घरात एकत्र असतात. मात्र, मोटारीतून जाताना त्यांना मास्क लावणे बंधनकारक केले होते. त्यावर अनेकांकडून टीकाही होत होती. याचा विचार करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत खासगी मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना मास्कच्या बंधनातून वगळण्याची सूचना केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात खासगी मोटारीतून प्रवास करण्यांना मास्क न वापरण्याची सवलत दिली आहे. त्याच अनुषंगाने आता दुचाकीवरुन प्रवास करण्यांनाही मास्कमधून सवलत देण्याचा विचार सुरु आहे.
दुचाकीस्वार प्रवास करताना वाहनांमुळे तो आपोआपच अंतर राखून असतो. त्यामुळे प्रवास करताना त्याने मास्क वापराला त्याला सवलत देणार आहे. मात्र, मोटारचालक व दुचाकीस्वार यांनी वाहनातून खाली उतरल्यानंतर मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. विनामास्क वाहनचालक, पादचा-र्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जाते. खासगी मोटारीप्रमाणेच दुचाकीस्वारांना मास्क वापरातून सवलत देण्याची घोषणा महापालिकेकडून करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.