पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल
By अजित घस्ते | Published: May 14, 2023 04:54 PM2023-05-14T16:54:45+5:302023-05-14T16:55:14+5:30
रत्नागिरी ,देवगड हापूसचा तुटवडा जाणवत असल्याने केसर आंब्याला चांगली मागणी
पुणे : रत्नागिरी ,देवगड हापूस आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर गावरान आणि गुजरातचा केसर आंब्याचा हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी रत्नागिरी हापूर आंब्याचा बाजारात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे मागणी असून ही हापूर आंबेची आवक कमी झाल्याने नागरिकांना यावर्षी हापूर आंब्याची चव चाखता आला नाही. मात्र यावर्षी केसर लवकर दाखल झाला आहे. यामुळे केसर आंब्याचा गोडवा वाढला असून या आठवड्यापासून केसर आंब्याची आवक बाजारात सुरू झाली आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या १५ तारखेनंतर बाजारात गुजरातमधून केसर आंब्याची आवक बाजारात सुरू होते. जून, जुलैपर्यंत हा हंगाम सुरू असतो. पाऊस पडण्यास सुरुवात झाली की, हापूस खराब होत असल्याने अनेकजण तो खात नाहीत. त्यानंतर गुजरातच्या केसरची मागणी वाढते. मात्र यावर्षी हे आंबे लवकरच बाजारात दाखल झाले आहेत. त्यातच रत्नागिरी ,देवगड हापूस आंब्याचा बाजारात तुटवडा जाणवत असल्याने आवक कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी केसर आंब्याला चांगली मागणी असून चांगला उठाव मिळत आहे.
गुजरातच्या जुनागड, वलसाड, वापी, धरमपूर, देगाम या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात या केसर आंब्याची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. रत्नागिरी हापूर आंब्यांचा हंगाम संपत आला की गुजरात केशर व गावरान केसरला ग्राहकांच्याकडून मागणी वाढते. एकदा की केशर आंबा दाखल झाला की त्याला मागणी ही वाढते आणि सामान्यांना परवडणा-या दरात मिळत असल्याने ग्राहकांच्याकडून मोठया प्रमाणात खरेदी केली जाते.यामुळे सामान्य नागरिक केसर गावरान आंब्याची वाटच पाहत असतात.त्यामुळे बाजारात यंदा हापूस आंब्याचा तुटवडा जाणवत असल्याने केसर आंब्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
घाऊक बाजारात केसर ६० ते ८० रुपये किलो
गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीत आता केसर आंब्याची आवक सुरू झाली आहे. सध्या ४०० ते ५०० आसपास पेट्या बाजारात येत असून साधारण १० ते १२ टन आवत सुरू आहे. घाऊक बाजारात केसर ६० ते ८० रुपये किलो आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलोने केसर आंबा मिळत आहे. पुढील आठवड्यात ही आवक आणखी वाढेल. -सिध्दार्थ खैरे मार्केटयार्ड आंबे व्यापारी